लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबईः खेळणी, स्वयंपाकघरातील वस्तू, गृहोपयोगी साज-सामान, दागिने, आरोग्य आणि व्यक्तिगत देखभालीची उत्पादने ते महाराष्ट्राची खास ओळख पैठणी साड्या, कोल्हापुरी चपलांचे उत्पादक असलेल्या लघु-व्यवसायिकांना आता जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहचता आले असून, राज्यातील अशा व्यावसायिकांची संख्या १५ हजाराच्या घरात जाणारी असल्याचे जागतिक ई-कॉमर्स व्यासपीठ ॲमेझॉनने स्पष्ट केले आहे.

पुणे, ठाणे, मुंबई, नागपूरच नव्हे तर जळगाव, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील छोटे उद्योगकर्ते उमदे निर्यात उत्पन्न कामावत आहेत, अशी ॲमेझॉन इंडियाचे जागतिक व्यापार विभागाचे संचालक भूपेन वाकणकर यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) व्यवसायांसाठी निर्यात सहजसोपी करण्यावर भर देत ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’ कार्यक्रमाने साधलेली ही किमया आहे. २०१५ साली सुरू झालेल्या या कार्यक्रमात सध्या देशभरातून सव्वा लाखापेक्षा अधिक निर्यातदार व्यापार करीत असल्याचे वाकणकर म्हणाले. यापैकी १,२०० निर्यातदारांनी २०२२ सालात १ कोटी विक्री उत्पन्नाचा गाठला आहे. कोल्हापूरच्या निर्यातदारांनी तर या सालात एकत्रित ४० लाख डॉलर (सुमारे ३३ कोटींच्या) विक्री उलाढालीचा टप्पा पार केला, अशी त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा >>>पीएसयू बँकांच्या जोरावर सेन्सेक्सची ४८६ अंशांची मुसंडी

अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग मंचावरील भारतीय लघु-व्यावसायिकांच्या निर्यातीने सध्या सुमारे ६६,४०० कोटी रुपयांपुढे मजल मारली असून, २०२५ अखेर त्यांची एकत्रित निर्यात उलाढाल दुपटीहून अधिक म्हणजेच दीड लाख कोटी रुपयांहून अधिक पातळी गाठेल, असा विश्वास वाकणकर यांनी व्यक्त केला.