मुंबई: म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळ्या प्रकारात, एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफ हा दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित, लवचिक तसेच किफायतशीर पर्याय राहिला आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात, शेअर बाजारात अस्थिरतेनंतरही फ्लेक्सीकॅप फंडांनी सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासह, गुंतवणूकदारांना चांगला लाभही दिला आहे. या दोन्ही वैशिष्ट्यांचा मिलाफ साधणारी योजना डीएसपी म्युच्युअल फंडाकडून सादर झाली आहे.
‘डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ’ या नवीन योजनेच्या शुभारंभाची घोषणा डीएसपी म्युच्युअल फंडाने सोमवारी केली. ही भारतातील पहिलीच फ्लेक्सीकॅप ईटीएफ योजना आहे. दर्जेदार व्यवसायांवर लक्ष केंद्रित करताना लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गतिमान पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या निवडक फ्लेक्सीकॅप फंडांचा समुच्चय करून त्यात गुंतवणुकीची संधी या योजनेतून मिळणार आहे. डीएसपी म्युच्युअल फंडाच्या या नवीन फंडाची प्रस्तुती (एनएफओ) २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली राहणार आहे.
भारतीय शेअर बाजार अनेकदा प्रवाहानुसार सतत चढ-उतार दर्शवितो. या निरंतर बदलत्या प्रवाहामध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कंपन्यांची कामगिरीही टप्प्याटप्याने बदलत असते. परंतु बहुतांश गुंतवणूकदारांसाठी, कोणत्या समभागामध्ये केव्हा गुंतवणूक करायची, किती निधी गुंतवायचा आणि समभागातून केव्हा आपली गुंतवणूक इतरत्र वळवायची, हे ठरविणे अतिशय कठीण असते. शिवाय वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी असे करणे खूप खर्चिकही असते. ही गुंतागुंत ईटीएफ योजना सहज दूर करते.
मिड आणि स्मॉल कंपन्यांचे समभाग वेगाने वाटचाल करत असताना, त्यामधील गुंतवणूक ही ‘फ्लेक्सीकॅप ईटीएफ’ योजनेद्वारे अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि नियमांच्या चौकटीत राहून वाढवत नेली जाईल. जेव्हा हे समभाग शिखर पातळीवर पोहचतील, त्यावेळी या समभागांमधील गुंतवणूक काढून ती लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतविली जाईल, असे या योजनेचे धोरण आहे. समभागांच्या निवडीसाठी अतिशय कठोर निकष वापरले जातात.
दमदार १७.६ टक्क्यांचा चक्रवाढ परतावा
ऑक्टोबर २००९ मध्ये शुभारंभ करण्यात आलेल्या ‘निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३०’ निर्देशांकाच्या कामगिरीवर ही योजना वाटचाल करणार आहे. या मानदंड निर्देशांकाने वार्षिक १७.६ टक्के चक्रवाढ दराने आजवर परतावा दिलेला आहे. शेअर बाजाराच्या विविध प्रवाहांमध्येसुध्दा या निर्देशांकाने निफ्टी ५०० टीआरआय या निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी बजावलेली आहे. २०११ आणि २०१८ मधील अभूतपूर्व बाजार घसरण आणि मंदीच्या काळातही या निर्देशांकाने गुंतवणूकदारांना फारशी झळ पोहचू दिलेली नाही. २०२० च्या कोविड घसरणीदरम्यानही या निर्देशांकाने आपले नुकसान मर्यादित ठेवले.
गुणवत्तेच्या शिस्तीबरोबरच अप्रत्यक्ष पद्धतीने (पॅसिव्ह) आणि कमी खर्चात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतून मिळणारी कार्यक्षमता हे या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे. गुंतवणूकसातत्य राखत शेअर बाजारातील विविध प्रवाहांदरम्यान सुयोग्य संधी हेरू पाहणाऱ्या आणि त्या माध्यमातून भांडवलवृद्धी हव्या असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही ईटीएफ योजना आदर्श ठरेल, असे तिच्या अनावरणाप्रसंगी डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रोडक्ट्स विभागाचे प्रमुख अनिल घेलानी म्हणाले. त्यांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी लवचिकता आणि गुणवत्ता या दोन शक्तिशाली संकल्पनांचा मिलाफ या योजनेने साधला आहे.