scorecardresearch

मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक नियोजन

आपल्या पाल्याला सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालकांनी स्वतः आर्थिक साक्षर होणे आणि आर्थिक नियोजन योग्यप्रकारे करणेदेखील आवश्यक आहे.

Financial planning secure future children
मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक नियोजन (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालक नेहमीच प्रयत्नशील असतात. मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी विविध प्रकारचे शिबीर, कला, कौशल्य संपादन करण्यासाठी पालक मुलांना विविध ठिकाणी पाठवत असतात. आपल्या पाल्याला सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालकांनी स्वतः आर्थिक साक्षर होणे आणि आर्थिक नियोजन योग्यप्रकारे करणेदेखील आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती आपण आजच्या लेखात घेऊया.

मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालक खालील पर्यायांचा समावेश आर्थिक नियोजनात करू शकतात.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान
hardeep singh nijjar murder case canada allegations on india
Video: “जे अमेरिकेनं लादेनबाबत केलं, तेच भारतानं…”, कॅनडाच्या आरोपांवर माजी अधिकाऱ्याचा अमेरिकेला घरचा आहेर; म्हणे, “स्वत:लाच फसवू नये”!

१) शैक्षणिक खर्च

शाळा / महाविद्यालयाचे शुल्क दिवसेंदिवस वाढते असून शिक्षणाचा खर्च वाढता राहणार आहे. साहजिकच वाढलेले शुल्क एकरकमी भरणे काहीसे कठीण होते. जर पालकांनी बँकेतील आवर्ती ठेवींच्या (रिकरिंग डिपॉजिट) मदतीने वर्षभर दरमहा बचत केली तर शिक्षणाच्या खर्चाचा भार हलका होऊ शकेल. रिकरिंग डिपॉजिटच्या ऐवजी म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’च्या मदतीने गुंतवणूक करून देखील १-२ वर्षात साध्य करावयाच्या उद्दिष्टासाठी तरतूद करता येईल.

उदा. शाळेचे वार्षिक शुल्क ८० हजार असेल तर दरमहा ७ हजार रुपयांची बचत रिकरिंग डिपॉजिटमध्ये करून वार्षिक शुल्क रक्कम उभारणे शक्य होईल.

२) मुलांच्या उच्च शिक्षणासाठीची तरतूद

प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ करावी.

उदा. सुरेश आणि त्याची पत्नी अलका यांचा मुलगा जय आज ७ वर्षाचा आहे. जय १८ वर्षाचा होईल त्यावेळेस उच्च शिक्षणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद सुरेश आणि अलका यांना करावयाची आहे. जर सुरेश आणि अलका यांनी दरमहा १८,५०० रुपायांची इक्विटी म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ केली तर पुढील ११ वर्षात त्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करता येईल. ( गृहीतक: इक्विटी म्युच्युअल फंड परतावा १२ टक्के)

३) सुकन्या समृद्धी योजना

मुलींच्या उच्च शिक्षण आणि लग्नाची तरतूद करण्यासाठी बचतीचा पर्याय म्हणून तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेची निवड करू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे- कमी जोखीम घेउन मुलीच्या शिक्षणासाठी / लग्नासाठी तरतूद करावयाची असल्यास सुकन्या समृद्धी योजना उपयुक्त आहे.

सुकन्या समृद्धी योजनेच्या मर्यादा – महागाईवाढीमुळे शिक्षण / लग्न याचा खर्च खूपच वाढला आहे. महागाईवाढीपेक्षा थोडाच जास्त परतावा सुकन्या समृद्धी योजनेत मिळतो साहजिकच भविष्यातील मोठा खर्च भागवण्यासाठी जास्त रकमेची बचत करणे आवश्यक असते. सर्वच पालकांना मोठ्या रकमेची बचत करणे शक्य नसते त्यामुळे शिक्षण / लग्न या उद्दिष्टांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही.

उपाय काय आहे? सुकन्या समृद्धी योजनेसह म्युच्युअल फंडाच्या योजनेत देखील गुंतवणूक करावी.

४) पाल्याचे उच्च शिक्षण आणि लग्न

पाल्याच्या उच्च शिक्षण आणि लग्न यासाठी आर्थिक नियोजनकाराच्या मदतीने पाल्य लहान असतानाच सुरवात केल्यास अधिक फायदेशीर असते. उदा. रमेश आणि त्याची पत्नी रेखा यांची कन्या माधुरी आज २ वर्षांची आहे. माधुरीच्या लग्नासाठीचा आजचा खर्च २० लाख रुपये असेल तर महागाई वाढ विचारात घेता पुढील २२ वर्षांनी माधुरीच्या लग्नाचा खर्च किमान ८९ लाखांपर्यंत वाढलेला असेल.

माधुरीच्या लग्नासाठी त्यांनी आजच गुंतवणुकीला सुरवात केल्यास, करावी लागणारी मासिक गुंतवणुकीची रक्कम आणि माधुरी मोठी झाल्यावर गुंतवणुकीस प्रारंभ केल्यास आवश्यक रक्कम खालील तक्त्यात दिली आहे.

वर्षमाधुरीचे वयबचत / गुंतवणूकअपेक्षित परतावा दरमहा आवश्यकबचत / गुंतवणूक
२०२३इक्विटी म्युच्युअल फंड१२%७,०००/-
२०२८इक्विटी म्युच्युअल फंड१२%१३,५००/-
२०३२१२इक्विटी म्युच्युअल फंड१२%२८,०००/-
२०३७१७बॅलन्सड म्युच्युअल फंड१०%७३,६००/-
२०४२२२बँक रिकरिंग डिपॉजिट७%३,४६,६००/-

५) आयुर्विमा कवच

कमावत्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाल्यास मुलांच्या शिक्षणात तसेच कुटुंबासमोर आर्थिक अडचणी उभ्या राहू नये यासाठी आयुर्विमा कवच घेणे आवश्यक आहे.

आयुर्विमा कवच किती रकमेचे असावे आणि किती कालावधीसाठी विमा स्वरक्षण असावे?

आपल्या जीवन शैलीनुसार मुलांच्या शिक्षणासह इतर महत्त्वाची आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करता येतील इतक्या रकमेचा आयुर्विमा असावा. पाल्य स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वकमाईला सुरुवात करेल किमान इतक्या कालावधीसाठी मुदत विम्याच्या मदतीने आपल्या कुटुंबियांसाठी आर्थिक तरतूद करावी.

आयुर्विमा खरोखरच आवश्यक आहे का?

अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात हा प्रश्न येतो. आपल्या ओळखीतील किमान एका घरात तरी कर्त्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाल्यामुळे मुलांचे शिक्षण योग्यप्रकारे पूर्ण न होणे अथवा मुलीच्या लग्नासाठी पुरेसा निधी नसल्याने लग्न वेळेत न होणे या समस्या आपण अनुभवल्या असतील. आयुर्विमा असेल आणि कर्त्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला तरीही आर्थिक बाजू सक्षम असल्याने मुलांचे शिक्षण तसेच लग्न यामध्ये आर्थिक समस्या येत नाहीत व उद्दिष्ट साध्य करणे शक्य होते.

थोडक्यात महत्त्वाचे – मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी आर्थिक साक्षर होऊन आर्थिक नियोजन करणे ही काळाची गरज आहे.

dgdinvestment@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 11:31 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×