जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रात मूलभूत कार्य करणाऱ्या १०० आश्वासक नवउद्यमींमध्ये भारतातील चार कंपन्यांनी स्थान पटकावले आहे. देशातील तंत्रज्ञान, शाश्वत विकास, अत्याधुनिक उत्पादन आणि सर्वंकष आरोग्य सुविधा या क्षेत्रातील नवउद्यमींचा यात समावेश आहे. जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) २०२३ सालासाठी ही यादी जाहीर केली आहे.
गिफ्टोलेक्सिया सोल्यूशन्स, एक्सॲकमॅझ टेक्नॉलॉजी, इव्होल्यूशन क्यू आणि नेक्स्ट बिग इनोव्हेशन लॅब्स या चार भारतीय नवउद्यमी कंपन्यांचा या जागतिक अग्रणी शंभरात समावेश झाला आहे. गिफ्टोलेक्सिया सोल्यूशन्सकडून शालेय विद्यार्थ्यांमधील गतिमंदतेचा धोका ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. एक्सॲकमॅझ टेक्नॉलॉजी ही कंपनी उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचे रुपांतर तापमान धोके, पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासन गुंतवणूक यासाठी करण्याचा मंच विकसित करीत आहे. इव्होल्यूशन क्यू ही कंपनी क्वांटम सेफ सायबरसुरक्षा उत्पादने तयार करीत आहे. नेक्स्ट बिग इनोव्हेशन लॅब्सकडून अवयवांची मागणी आणि थ्रीडी जैवअभियांत्रिकी अवयवांची उपलब्धता यावर काम सुरू आहे.
या यादीत ३१ देशांतील नवउद्यमींचा समावेश आहे. यादीतील एक तृतीयांश कंपन्यांचे नेतृत्व महिला करीत आहेत. आश्वासक नवउद्यमींमध्ये अमेरिकेतील सर्वाधिक २९ कंपन्या आहेत. चीन १२ कंपन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. शेतकरी, कृषीसंलग्न उद्योग आणि सरकार यात दुवा म्हणून काम करणाऱ्या फार्मरलाइन (घाना) आणि पाण्यापासून हायड्रोजन वायू विलग करून त्यापासून पर्यायी अक्षय्य ऊर्जा तयार करणाऱ्या इलेक्ट्रिक ग्लोबल (इस्रायल) या वेगळ्या धाटणीच्या नवउद्यमी उपक्रमांचाही या प्रतिष्ठित यादीत समावेश आहे.

