बेंगळूरु : परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) सरलेल्या जुलै महिन्यात माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांचे सुमारे ११,७६३ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले, अशी माहिती ‘एनएसडीएल’ने बुधवारी दिली.

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सप्टेंबरपासून दरकपातीचे संकेत दिल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी उदयोन्मुख देशातील भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी देशांतर्गत आघाडीवर त्यांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे समभाग खरेदीचे स्वारस्य दाखवले, असे विश्लेषकांनी सांगितले. तथापि अमेरिकेतील मंदीच्या भीतीने सुरू झालेल्या पडझडीत मागील तीन सत्रांत, स्थानिक बाजारात त्यांची भूमिका निव्वळ विक्रेता अशी राहिली असून, ऑगस्टमध्ये त्यांनी आजवर जवळपास १७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचीही बाजारांकडून उपलब्ध आकडेवारी दर्शविते.

हेही वाचा >>> पेटीएममधील गुंतवणुकीतून जपानच्या सॉफ्टबँकेला ४.५ हजार कोटींचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आघाडीच्या दोन आयटी कंपन्या, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिसने सरलेल्या जून-तिमाहीत चमकदार आर्थिक कामगिरी केली. त्या तुलनेत मात्र तिसरी मोठी आयटी कंपनी असलेल्या विप्रोने गुंतवणूकदारांची निराशा केली. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कंपन्यांच्या पथ्यावर पडली. निफ्टी आयटी निर्देशांक जुलैमध्ये सुमारे १३ टक्क्यांनी वधारला असून ऑगस्ट २०२१ नंतरची या निर्देशांकाची ही सर्वोत्तम मासिक कामगिरी आहे. आयटी क्षेत्राबरोबरच वाहन निर्मिती, धातू आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी होती. ‘एनएसडीएल’च्या आकडेवारीनुसार, एफपीआयने जुलैमध्ये ३२,३६५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, जी चार महिन्यांच्या उच्चांकी आहे.