पीटीआय, कोलकाता

सलग चार महिने किरकोळ महागाई दरात जरी नरमाई दिसून येत असली तरी, मुख्य चलनवाढीचा (कोअर इन्फ्लेशन) दर वरच्या दिशेने जात आहे. हे पाहता अनिश्चित चढ-उतार होत राहणाऱ्या अन्न आणि ऊर्जा घटकांप्रमाणेच, सोन्यालाही या मुख्य चलनवाढीच्या मापनांतून वगळले जावे, असे ‘क्रिसिल’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या टिपणांतून सुचविले आहे.

सरलेल्या मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर जरी ७५ महिन्यांच्या नीचांकी २.८ टक्क्यांवर घसरला असला आणि हा एक शुभसंकेत असला तरी मागील चार महिन्यांत कोअर इन्फ्लेशन अर्थात ऊर्जा व अन्न घटकांच्या किमतींचा अपवाद करता मुख्य चलनवाढीचा दर निरंतर ४ टक्क्यांच्या पातळीवर राहिला आहे, याकडे या आघाडीची पतमानांकन संस्थेने टिपणांतून लक्ष वेधले आहे.

मे २०२४ ते मे २०२५ दरम्यान, कोअर चलनवाढ १११ आधार बिंदूंनी (१.११ टक्के) वाढून ४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. गत दशकभरातील प्रवाहाच्या विपरित या दराचे स्वरूप तूर्त निम्न पातळीवर असल्याचे क्रिसिलने नमूद केले आहे. तथापि त्यातील सातत्यपूर्ण वाढीतून, रिझर्व्ह बँकेसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या किरकोळ चलनवाढीला जोखीम संभवते असेही तिने म्हटले आहे.

वाढत्या कोअर चलनवाढीमुळे अर्थव्यवस्थेतील देशांतर्गत मागणी मजबूत होत असल्याचे दिसून येते. मात्र त्यातील वाढीचा सखोल अभ्यास केल्यास दिसून येते की, अलीकडील वाढ ही देशांतर्गत घटकांपेक्षा जागतिक आर्थिक अस्थिरतेशी संबंधित आहे, असे क्रिसिलने म्हटले आहे. सोन्याच्या किमती देशांतर्गत या जागतिक संकेतांना प्रतिक्रिया म्हणून चढ-उतार दर्शवत असतात. जरी किरकोळ चलनवाढ म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकात सोन्याचे भारमान (एकूण निर्देशांकाच्या १.१ टक्के) हे कमी असले तरी, कोअर चलनवाढीत त्याचा समावेश असल्याने देशांतर्गत किंमतवाढीबाबत संकेत बिघडविण्यास ते कारण ठरतात, असे या संस्थेचे मत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या कोअर निर्देशांकात सोन्याचे भारमान जगात इतरत्र जे आहे त्यापेक्षा जास्त आहे. जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांनीही त्यांच्या कोअर निर्देशांकात सोन्याचा समावेश केला आहे, परंतु त्याचे भारमान भारतापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या कोअर चलनवाढीच्या मापनावर त्याचा परिणाम मर्यादित राहतो. मात्र इतर देशांच्या तुलनेत सोन्याला भारतात मागणी मोठी असल्याने त्याचा निर्देशांकातील वाटाही जास्त आहे. तथापि त्यातून कोअर निर्देशांकाबाबत चुकीचे संकेत दिले जात आहेत, असे क्रिसिलने म्हटले आहे.