लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

पुणे : यंदा सोन्याच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळाले आहेत. मध्यवर्ती बँकांच्या धोरणातील बदल, भूराजकीय अनिश्चितता यामुळे सोन्याच्या भावात अस्थिरता दिसून आली. असे असले तरी मध्यम कालावधीसाठी सोन्याचा भाव तोळ्याला ६३ हजार रुपयांच्या पातळीवर राहील, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.

सर्वसाधारणपणे सणासुदीच्या काळात सोन्याला मागणी वाढते. मात्र, मागील काही काळापासून गुंतवणूकदार योग्य संधी शोधून सोन्यात गुंतवणूक करण्यास पसंती देत आहेत. याच वेळी सोन्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावाही दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्ही २०१९ च्या दिवाळीत सोन्यात गुंतवणूक केली असेल तर आता तुम्हाला मिळालेला परतावा ६० टक्के असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव या वर्षाच्या सुरुवातीला प्रति औंस २,०७० डॉलरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तो नंतर १,८०० डॉलरवर घसरला. आता सोने पुन्हा प्रति औंस २ हजार डॉलरच्या पातळीवर आहे, असे अहवालात म्हटले आहे.

आणखी वाचा-टाटांची व्होल्टास विकली जाणार का? आता कंपनीनंच दिलं स्पष्टीकरण

प्रमुख मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात मागील काही काळात मोठी वाढ केली आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने मागील वर्षापासून ५.२५ टक्क्यांनी व्याजदर वाढविले आहेत. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकांकडून हे पाऊल उचलण्यात आले. याच वेळी वेतन, इंधन आणि अन्नधान्याची वाढती महागाई या बाबी मध्यवर्ती बँकांची चिंता वाढविणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बँकांची भूमिका सोन्याच्या भावातील वाढ कायम राहण्यास साहाय्यकारी ठरत आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्याजदर वाढीवर तेजीचे गणित

नजीकच्या काळातील भू-राजकीय तणाव आणि प्रमुख मध्यवर्ती बँकांनी व्याजदरांबाबत घेतलेली जैसे थे भूमिका यामुळे सोन्याच्या भावातील तेजीला बळ मिळत आहे. त्याआधी मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर वाढीच्या चक्रामुळे सोन्याची झळाळी काही प्रमाणात कमी झाली होती. तर येत्या काळात भू-राजकीय तणाव निवळल्यास सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्यातील ओढा कमी होण्याची शक्यता आहे. याच वेळी वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढ झाल्यासही सोन्याचे भाव कमी होऊ शकतात. मात्र, अनिश्चितता निर्माण करणाऱ्या घटकांचा प्रभाव दीर्घकाळ कायम राहणार असल्याने सोन्याच्या भावातील तेजी कायम राहील, असा मोतीलाल ओसवाल फायनान्शियलच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.