लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: भारतातील मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी सॅप इंडियाने ‘ग्रो विथ सॅप’ मोहिमेची घोषणा करत त्यांना डिजिटल परिवर्तनाचा फायदा मिळवून देण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या मध्यम आकाराच्या उद्योगांना व्यवसाय वाढीसाठी तंत्रज्ञान नावीन्यतेचा अवलंब करता येईल. जेणेकरून व्यवसायाची गती आणि विश्वसनीयता वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे सॅप इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कुलमीत बावा यांनी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शनल सेंटर येथे निवडक पत्रकारांची संवाद साधताना स्पष्ट केले.
सॅपच्या सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून उद्योगांना दैनंदिन उपयोगाचे लेखा अहवाल, खरेदी व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, अनुपालन आणि पुरवठा शृंखला यांसारखी कार्ये लीलया पार पाडता येतात.
आणखी वाचा- स्वदेशी ‘कू’कडून ३० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ
भारतात सध्या लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग वेगाने प्रगती करत आहेत. त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर आणि प्रक्रियेत सॅपने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून एन्टरप्राइज ॲप्स, स्वयंचलित प्रक्रिया (ऑटोमेट प्रोसेस) आणि डिझाइन हे कोड न लिहिता करता येणे शक्य होईल. या तंत्रज्ञानाच्या वापराने मध्यम आकाराच्या कंपन्या देशातील डिजिटल बदलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांच्यामुळे रोजगार निर्माण होऊन सकल राष्ट्रीय उत्पादनात त्यांचे मोठे योगदान आहे. क्लाऊड तंत्रज्ञानामुळे ईआरपीमध्ये क्रांती होत आहे. म्हणूनच मध्यम आकाराच्या कंपन्यांना त्यांच्या वाढीसाठी विश्वसनीय तंत्रज्ञानाने युक्त मंचाची गरज आहे, असेही बावा यांनी सांगितले.
भारतात सध्या अभियांत्रिकी, बांधकाम, जीवन विज्ञान, वेष्टनांकित केलेल्या वस्तू व्यवसाय, रिटेल आणि माहिती तंत्रज्ञान ही उभरती क्षेत्रे असून या क्षेत्रात सॅप इंडियाच्या तंत्रज्ञानाला मोठी मागणी आहे. सध्या कंपनीकडील ८० टक्के ग्राहक सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) क्षेत्रातील आहेत. तसेच भारतातील शंभरहून अधिक नवउद्यमींपैकी (युनिकॉर्न) ४० सॅप इंडियाच्या सॉफ्टवेअर प्रणालीवर कार्यरत आहेत.