मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाची येत्या १९ जुलै २०२५ रोजी बैठक पार पडणार आहे. या संचालक मंडळाच्या बैठकीत विशेष अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा आणि बोनस शेअर देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय संचालक मंडळ ३० जूनअखेर सरलेल्या तिमाहीची आर्थिक कामगिरी जाहीर करणार आहे.

विशेष अंतरिम लाभांश आणि बोनस शेअरच्या घोषणेमुळे भागधारकांकडील समभागांचे मूल्य वाढू शकते. शिवाय ते बँकेची मजबूत आर्थिक कामगिरी प्रतिबिंबित करते. हा निर्णय संचालक मंडळाच्या मंजुरी आणि नियामक अनुपालनाच्या अधीन आहे.

एचडीएफसी बँकेने यापूर्वी दोन स्टॉक स्प्लिट अर्थात शेअरचे विभाजन केले होते. जुलै २०११ मध्ये एचडीएफसी बँकेने एका शेअरचे पाच भागात विभाजन केले होते. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये एचडीएफसी बँकेने पुन्हा शेअर विभाजन करत एका शेअरचे दोन भागात विभाजन केले होते.

देशातील गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेत १ जुलै २०२३ मध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील हे आजवरचे सर्वात मोठे विलीनीकरण होते. एचडीएफसी लिमिटेड ही गृह वित्त कंपनी एचडीएफसी बँकेमध्ये विलीन झाल्यानंतर एचडीएफसी लिमिटेडच्या समभागांचे व्यवहार थांबविले जाऊन तिच्या समभागांची सूचिबद्धता १३ जुलै २०२३ पासून संपुष्टात (डिलिस्ट) आणली होती. सर्व समभाग एचडीएफसी बँकेत विलीन करण्यात आले. म्हणजेच ज्यांच्याकडे त्यावेळी एचडीएफसी लिमिटेडचे शेअर होते, त्यांना एचडीएफसी बँकेचे शेअर देण्यात आले होते. एचडीएफसी बँकेचा शेअर बुधवारच्या सत्रात १४ रुपयांनी वधारून २००९.८० रुपयांवर व्यवहार करतो आहे.