मुंबई : प्रत्येकाचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते. मात्र बऱ्याचदा बँकांच्या चढ्या गृहकर्जाच्या दरामुळे (होमलोन रेट ) ते परवडत नाही. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह खासगी क्षेत्रातील बँका अगदी ८ टक्क्यांपासून गृहकर्ज देतात. मात्र घर खरेदी करण्यासाठी अगदी १ टक्के व्याजदराने सहज कर्ज मिळणे शक्य आहे. एक टक्के दराने कर्ज मिळवणे कठीण वाटत असले तरी ते शक्य आहे.

मध्यमवर्गीय कुटुंब अगदी कष्ट करून आणि निश्चित उत्पन्नाचे (फिक्स इन्कम) साधन म्हणून मुदत ठेव अर्थात बँकेत एफडी करतो. याच मुदत ठेवींवर आपल्याला बँक अगदी अर्धा ते एक टक्के दराने कर्ज देते. एफडीच्या एकूण रकमेच्या ८५ ते ९० टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. एफडीवर ओव्हरड्राफ्ट काढताना कोणतेही कागदपत्रे किंवा कारणे बँक विचारत नाही. कारण तुमच्याच ठेवींवर तुम्ही कर्ज घेत असतात.

याचे फायदे काय आहेत?

१.  होमलोन घेताना बँकेकडे अनेकदा खेटे घालावे लागतात. मग प्रोसेसिंग फी, घर तारण ठेवावे, इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात तीन वर्षांचे आयटीर दाखल करावे लागतात. शिवाय बँक स्टेटमेंट अशा सगळ्या भानगडी कराव्या लागतात. पण एफडीवर ओव्हरड्राफ्ट काढताना काहीच करावे लागत नाही , प्रोसेसिंग फी सुद्धा बँकेकडे भरावे लागत नाही.

२. एफडी न मोडता देखील बँक तुम्हाला १ टक्के दराने कर्ज देते.

३. आपण बँक एफडीवर कर्ज घेत असल्याने एफडीवरचे व्याज सुरूच राहते आणि तेच व्याज आपण एफडीवर काढलेल्या ओव्हरड्राफ्टमध्ये भरू शकतो. त्या बँकेकडून एफडीवर मिळालेल्या व्याजात फक्त १ टक्के व्याजाची भर घालून हप्ता भरायचा.

४. बँका ८ ते १३ टक्के दराने होमलोन देतात पण इथे फक्त १ टक्के दराने कर्ज उपलब्ध होईल.

५. एफडीवरून जो ओडी तुम्ही घेतला आहे, त्यातली जेवढी रक्कम तुम्ही वापराल त्यावरच व्याज भरावे लागते.

६. गृह कर्ज मंजूर होण्यासाठी बँकेमध्ये बराच वेळ लागतो. बऱ्याचदा बँक अधिकाऱ्याच्या हातापाया पडावे लागते. पण एफडीवर कर्ज म्हणून ओडी अगदी काही तासात मिळते.

७. महत्त्वाचे म्हणजे होमलोन घेतल्यावर बँक आधी तुमच्याकडून फक्त व्याजाच्या रकमेची वसुली करते. म्हणजे वर्ष भरानंतर तुम्ही लोन स्टेटमेंट काढले तर कर्जाची मूळ रक्कम थोडीच भरली गेली असल्याचे निदर्शनास येईल. कारण बँक कर्जावरचे व्याजच आधी घेते. पण एफडीवर ओव्हरड्राफ्ट घेतला तर व्याजासोबत मुद्दल सुद्धा भरली जाते. म्हणजेच आता एक टक्क्याने कर्ज मिळवता येणे शक्य आहे, शिवाय दर महिन्याचे ईएमआयचे टेन्शन नाही.