मागील लेखात शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागाच्या व्यवहारांवर कर आकारणी कशी केली जाते, हे बघितले. असे व्यवहार करताना करदात्याला बक्षीस (बोनस) समभागसुद्धा मिळू शकतात किंवा काही कंपन्यांकडून समभागांची पुनर्खरेदी (बायबॅक) सुद्धा केली जाते. असे बक्षीस समभाग मिळाल्यास किंवा त्याची विक्री केल्यास करदात्याला कर कसा आणि किती भरावा लागतो? तसेच कंपन्यांनी समभागाची पुनर्खरेदी केल्यास करदात्यांना कर कसा भरावा लागेल? ते या लेखात बघू.
बक्षीस समभाग
बक्षीस समभाग म्हणजे अतिरिक्त समभाग जे कंपनीकडून तिच्या विद्यमान भागधारकांना मोफत दिले जातात, यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता नसते. हे समभाग प्रत्येक भागधारकाला त्याच्याकडे असलेल्या समभागाच्या प्रमाणात वितरित केले जातात. बक्षीस समभाग हे कंपनीकडून तिच्या भागधारकांना मिळणारे बक्षीस आहे, हे समभाग कंपनीच्या संचित साठ्यातून दिले जातात. अशा संचित साठ्यातून रोख लाभांश म्हणून वितरित करण्याऐवजी शेअरमध्ये रूपांतरित केले जातात. लाभांश म्हणून वितरित केल्यास भागधारकाला त्यावर कर भरावा लागतो. परंतु भागधारकाला जेव्हा कंपनीकडून बक्षीस समभाग मिळतात, तेव्हा भागधारकाला किंवा कंपनीला कर भरावा लागत नाही. भागधारक जेव्हा हे समभाग विकतो तेव्हा होणाऱ्या भांडवली नफ्यावर त्याला कर भरावा लागतो. बक्षीस समभागाचे खरेदी मूल्य शून्य समजून अल्प किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणावा लागतो. बक्षीस समभाग मिळाल्यानंतर ते १२ महिन्यांनंतर विकल्यास त्यावर होणारा भांडवली नफा दीर्घ मुदतीचा असेल आणि १२ महिन्यांच्या आत विकल्यास होणारा भांडवली नफा अल्प मुदतीचा असेल.
सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागाच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कराच्या तरतुदीत १ फेब्रुवारी, २०१८ नंतर बदल झाला. त्यामुळे जे समभाग विकले ते आपल्याला दोन भागांत विभागावे लागतात, एक म्हणजे ३१ जानेवारी, २०१८ पूर्वी बक्षीस जाहीर झालेले समभाग आणि दुसरे म्हणजे १ फेब्रुवारी, २०१८ नंतर जाहीर झालेले बक्षीस समभाग. जे समभाग ३१ जानेवारी २०१८ पूर्वी बक्षीस म्हणून जाहीर झाले आहेत त्यांच्या विक्रीवरील भांडवली नफा गणताना त्याचे खरेदी मूल्य पुढील (१) आणि (२) मधील जे जास्त आहे ते (१) शेअरचे खरेदी मूल्य (बोनस समभागासाठी शून्य), आणि (२) (अ) ३१ जानेवारी, २०१८ रोजीचे वाजवी बाजार मूल्य (खरेदी केलेले व बोनस समभाग धरून), आणि (ब) विक्री मूल्य, या (अ) आणि (ब) मधील जे कमी आहे ते. यानुसार खरेदी मूल्य गणून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणावा लागेल. जे बक्षीस समभाग १ फेब्रुवारी, २०१८ नंतर मिळाले आहेत, त्यांच्यासाठी त्याच्या विक्रीवर भांडवली नफा गणताना खरेदी मूल्य शून्य समजावे लागते. अशा समभागाच्या विक्रीवर झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कलम ‘११२ अ’नुसार कर भरावा लागेल. १,२५,००० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर १२.५० टक्के इतक्या सवलतीच्या दराने (अधिक ४ टक्के शैक्षणिक अधिभार) कर भरावा लागेल.
समभागाच्या पुनर्खरेदीवर कर आकारणी
समभागाची पुनर्खरेदी म्हणजे कंपनी स्वतःच्याच समभागाची खरेदी, निविदेद्वारे किंवा खुल्या बाजारातून करते. एखादी कंपनी विविध कारणांसाठी पुनर्खरेदीचा अवलंब करू शकते, उदा., कंपनीकडे जास्त रोख रक्कम असल्यास आणि भागधारकास वितरित करण्यासाठी किंवा बाजारात जास्त समभाग असल्यास, समभागाची कामगिरी चांगली नसल्यास, साधारणपणे, कंपन्या सध्याच्या बाजारभावापेक्षा जास्त किमतीला समभागाची पुनर्खरेदी करते. समभागाची पुनर्खरेदी, कंपनीकडे असलेल्या संचित साठ्यातून केली जाते.
पूर्वी शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांनी पुनर्खरेदी केलेल्या शेअरवर झालेल्या भांडवली नफ्यावर गुंतवणूकदारांना कर भरावा लागत नव्हता. शेअर पुनर्खरेदीमध्ये गुंतवणूकदाराला जरी कर भरावा लागत नव्हता तरी कंपन्यांना मात्र या व्यवहारावर २० टक्के इतका कर भरावा लागत होता. अशीच तरतूद लाभांशावरील करासाठी होती. कंपनीला लाभांश जाहीर केल्यानंतर ‘लाभांश वितरण कर’ (डीडीटी) भरावा लागत होता आणि या लाभांशावर गुंतवणूदाराला कर भरावा लागत नव्हता. कालांतराने या दोन्ही उत्पन्नाच्या कर आकारणीची पद्धत बदलण्यात आली. या नवीन पद्धतीमध्ये कंपनीला कर भरावा लागत नाही, गुंतवणूकदाराला मात्र कर भरावा लागतो.
१ ऑक्टोबर, २०२४ पासून समभागाच्या पुनर्खरेदीवरील कर आकारणीत बदल करण्यात आला आहे, कंपन्यांकडून समभागाच्या पुनर्खरेदीवर मिळालेली संपूर्ण रक्कम ही लाभांश म्हणून समजण्यात येईल. या रकमेतून समभाग खरेदी किंवा इतर खर्चाची वजावट मिळणार नाही. या लाभांशावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. कंपनीने समभागाची पुनर्खरेदी केल्यानंतर त्या समभागावरील हक्क संपल्यामुळे, करदात्याला भांडवली तोटा होतो. हा भांडवली तोटा गणताना या समभागाची विक्री किंमत ही शून्य समजावी आणि प्रत्यक्ष खरेदी मूल्य विचारात घ्यावे. हा भांडवली तोटा समभागाच्या धारणकाळानुसार अल्प किंवा दीर्घ मुदतीचा ठरविला जाईल. हा भांडवली तोटा इतर भांडवली तोट्यातून वजा करता येईल. अल्पमुदतीचा भांडवली तोटा हा अल्प आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून तर दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येईल. तो या वर्षी वजा होत नसेल तर पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येईल. यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक असेल.
उदाहरणादाखल समभागाच्या पुनर्खरेदीवर करदात्याला खालीलप्रमाणे उत्पन्न किंवा तोटा दाखवून कर भरावा लागेल. करदात्याने २०२० मध्ये एका कंपनीचे ५०० समभाग प्रत्येकी १,००० रुपयांना असे एकूण ५,००,००० रुपयांना खरेदी केले होते. कंपनीने जून, २०२५ मध्ये २०० समभाग प्रत्येकी ३००० रुपयांना असे एकूण ६,००,००० रुपयांना पुनर्खरेदी केले. करदात्याला मिळालेले ६,००,००० रुपये लाभांश म्हणून इतर उत्पन्न या उत्पन्नाच्या स्रोतात करपात्र असतील. या लाभांशावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. जर करदाता ३० टक्के कराच्या टप्प्याप्रमाणे कर भरत असेल, तर त्याला १,८०,००० रुपये (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) कर भरावा लागेल. कंपनीने पुनर्खरेदी केलेले २०० समभाग हे त्याने प्रत्येकी १,००० रुपयांना असे एकूण २,००,००० रुपयांना खरेदी केले होते. भांडवली तोटा गणताना याची विक्री किंमत शून्य समजून आणि खरेदी मूल्य २,००,००० रुपये विचारात घेऊन २,००,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा करदात्याला होतो. हा तोटा करदाता इतर व्यवहारातून झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करून करदायित्व कमी करू शकतो. करदात्याला या वर्षी इतर व्यवहारातून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला नसल्यास तो पुढील वर्षासाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करू शकतो आणि पुढील वर्षीच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करू शकतो. हे समभाग करदात्याने जानेवारी, २०२५ मध्ये खरेदी केले असल्यास आणि कंपनीने समभागाची पुनर्खरेदी जून, २०२५ मध्ये केल्यास त्याला अल्प मुदतीचा भांडवली नफा होईल.
– प्रवीण देशपांडे
pravindeshpande1966@gmail.com