एखाद्या व्यक्तीला जेव्हा स्वतःचे खर्च कमी करायची वेळ येते, तेव्हा सर्वात पहिला विचार मनात कोणता येतो? तो म्हणजे माझ्या कुटुंबासाठी मी कुठे कमी पडलो/पडले का? पुढचा विचार येतो तो समाजाचा – लोक काय म्हणतील माझी अशी परिस्थिती बघून? माझ्याबद्दलचा आदर आणि माझ्या कुटुंबाची पत कमी होणार ना यामुळे अशा सगळ्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना एकट्याने सामोरं जाताना खूप मानसिक त्रास होतो आणि म्हणूनच आज हा विषय मी सर्वांसमोर मांडायचा निर्णय घेतला.
प्रत्येकाचं राहणीमान हे त्याच्या परिस्थिती आणि मन:स्थिती दोन्ही आधारस्तंभांवर ठरतं. दोन्हीपैकी एकात जरी बदल झाला तरी राहणीमान बदलतं. आपण सर्वच आशावादी असतो. पुढे काय मिळणार त्यानुसार आज काय करायचंय हे ठरवतो. राहणीमानाच्या बाबतीत तसंच आहे. आता मला मोठा पगार मिळणार या अपेक्षेने आपण कर्ज घेतो. कधी या कर्जामधून गरज भागते तर कधी चैन. कधी कधी तर आपण इतरांबरोबर स्पर्धा लावून मुद्दाम आपलं राहणीमान उंचावून घेतो. पुढचं पुढे बघता येईल या विश्वासावर आपण एक असा डोलारा उभा करून ठेवतो, ज्याला कधीतरी परिस्थितीच फटका देते आणि मग त्याचा परिणाम आपल्या मनःस्थितीवर आधी आणि नंतर शरीरावर होतो.
एका कुटुंबाचा मला इथे खास उल्लेख करावासा वाटतो. मागील ७ वर्षे मी त्यांचं आर्थिक नियोजन करत आहे. अतिशय सुटसुटीत राहणीमान आणि जमेल तितकी गुंतवणूक हे धोरण त्यांनी आजपर्यंत पाळलं. पगार वाढला तरीसुद्धा खर्च बेतात ठेवल्यामुळे, एका मोठ्या आर्थिक नुकसानातून ते बाहेर पडले आणि सगळं रुळावर आणलं. इथे त्यांनी खर्चांवर चांगलंच नियंत्रण ठेवल्यामुळे त्यांना हे जमलं. शिवाय हातात नोकरी आणि वय हे दोन्ही होतं. म्हणून हताश न होता पुढचा प्रवास सुरू ठेवला.
अजून एका जोडप्याचा उल्लेख करते. नुकतंच लग्न झालेलं हे जोडपं एक मोठी यादी घेऊन आलं. यादीमध्ये घर, फिरणं, समारंभ सगळ्याच गोष्टींचा उल्लेख होता. साधारणपणे १५-२० आर्थिक ध्येयांचा संच होता. तरुण कुटुंब म्हणून असं असणं साहजिकच होतं, परंतु त्यात एक गोष्ट प्रकर्षाने त्यांनी जाणवून दिली की, त्यांच्या मित्रपरिवारात ते कुठेतरी मागे असल्याचं त्यांना वाटतं. म्हणून त्यांना या सर्व गोष्टींची तरतूद करायची आहे. यात त्यांचं कुठे तरी चुकतंय हे त्यांच्या लक्षात यायला, तसे ते इतके लहानपण नव्हते, परंतु या गोष्टीचा दीर्घकाळानंतर होणारा परिणाम समजण्याइतके मोठेपण नव्हते.
मुळात राहणीमान काय असावं? हा जरी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरीसुद्धा याचं मूळ कुठंतरी आपली जुनी परिस्थिती, लहानपणी मिळालेले संस्कार, आजूबाजूला पाहिलेलं आणि स्वतः अनुभवलेलं पैशाचं सामर्थ्य, या सर्वांशी सापडतं. आपल्याकडे काय असलं तर आपलं कुटुंबातील आणि समाजातील स्थान चांगलं राहील याचं सर्वात सोपं उत्तर म्हणजे – पैसा.
कुटुंबामध्ये कमावणाऱ्या व्यक्तीला अधिक मान मिळतो, समाजात धनाढ्य व्यक्ती पुढे असतात. त्यात करूनसुद्धा जे इतरांना आपण किती जास्त खर्च करू शकतो किंवा आपल्याकडे किती संपत्ती आहे हे भासवू शकतात, अशा लोकांचा इतरांना हेवा वाटणं फार साहजिकच आहे. पण अशासुद्धा अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपण पाहतो, ज्यांनी भरपूर मालमत्ता जमवूनसुद्धा कधीच त्याचा गवगवा केला नाही. त्यांचं राहणीमान तसंच ठेवलं आणि पुढच्या पिढीसाठी व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून देत गेले.
तेव्हा किती कमावलं, की खर्च किती करायचा याचे एक गणित आहे. त्यासाठी किती मिळकत असली पाहिजे हे दुसरं. संपत्तीनिर्मिती जर हवी असेल, तर मुळात आयुष्यात काय करायचंय आणि त्यासाठी किती मेहनत आणि जोखीम घ्यावी लागेल यावर लक्ष ठेवून वाटचाल केली की मिळकत ही येतेच. परंतु खर्च वाढत आहेत, म्हणून पगार वाढला पाहिजे अशी परिस्थिती झाली की पदराशी निराशा येते. कारण एका विशिष्ट वयानंतर सामान्य कामासाठी कोणीच जास्त पगार देत नाही.
एखादं चांगलं कौशल्य असेल तर त्याच्या मागणी-पुरवठा समीकरणानुसार मिळकत होऊ शकते. पण हे नेहमीच तसंच राहील असं नसतं. आता ही खेळाडू मंडळी, कलाकार, इत्यादी कौशल्य असणारी माणसं त्याच्या चांगल्या कारकीर्दीमध्ये भरपूर काम आणि त्यानुसार भरपूर कमाई करतात. पण त्यांची कारकीर्द कमी असू शकते. त्यासाठी त्यांनी आधी कमावलेल्या पैशातून पुढे कसं भागवता येईल याची तरतूद केली असते.
खालील तक्त्यातून मी काही आकडे वाचकांच्या निर्दशनास आणू इच्छिते
आजचे वार्षिक खर्च – रु. १० लाख, निवृत्तीचा काळ – ३० वर्षे
निवृत्ती २५ वर्षांनंतर निवृत्ती ५ वर्षांनंतर
महागाई निवृत्ती निधीचा परतावा निवृत्ती निधी (रु. कोटी) महागाई निवृत्ती निधीचा परतावा निवृत्ती निधी (रु. कोटी)
- ८% – ९% – १८.०३ – ८% – ९% – ३.८७
- ९% – ७% – ३४.२७ – ९% – ७% – ६.११
- ८% – ७% – २३.५९ – ८% – ७% – ५.०६
आजचे वार्षिक खर्च – रु. १५ लाख, निवृत्तीचा काळ – ३५ वर्षे
निवृत्ती २५ वर्षांनंतर निवृत्ती ५ वर्षांनंतर
महागाई निवृत्ती निधीचा परतावा निवृत्ती निधी (रु. कोटी) महागाई निवृत्ती निधीचा परतावा निवृत्ती निधी (रु. कोटी)
- ८% – ९% – ३०.८७ – ८% – ९% – ६.६२
- ९% – ७% – ६३.११ – ९% – ७% – ११.२६
- ८% – ७% – ४२.३० – ८% – ७% – ९.०८
वरील तक्त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की महागाई आणि परताव्याचा दर कमी-जास्त झाल्याने किती फरक पडतो. त्यात जर निवृत्तीपश्चात खर्च वाढले किंवा आयुर्मान वाढलं तर निधी अपुरा पडू शकतो. परतावे महागाईपेक्षा कमी असल्यास निवृत्ती निधी जास्त लागतो.
हल्ली आपण सगळीकडे लवकर निवृत्ती घेण्याच्या गोष्टी ऐकतो. कमी वयात भरपूर काम केल्यानंतर आलेला कंटाळा किंवा तब्येतीच्या कुरबुरी किंवा भरपूर पैसे कमावल्याचं समाधान किंवा सक्तीची सेवानिवृत्ती यासारख्या कारणांमुळे हे असू शकतं. परंतु कोण किती आणि कशा प्रकारे जगतं हे आधी थोडेच माहीत असतं. तेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा रास्त राहणीमान ठेवून, जास्त गुंतवणूक केली तर फायदा तुमचाच.
तृप्ती राणे
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण : हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.