मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने नवीन बचत खात्यांसाठी किमान मासिक सरासरी शिल्लक रकमेची मर्यादा लक्षणीयरीत्या वाढण्याची गेल्या आठवड्यात घोषणा केली होती. मात्र देशभरातून बँकेच्या निर्णयावर टीकेची झोड उठल्यानांतर बँकेने महानगर, शहरी आणि निमशहरी ग्राहकांनी उघडलेल्या नवीन खात्यांसाठी किमान ५०,००० रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट बुधवारी सायंकाळी रद्द करत असल्याचे जाहीर केले.
बँक ग्राहकांची लूट तसेच देशाच्या आर्थिक समावेशकतेच्या तत्त्वाला हरताळ अशा शब्दांत आयसीआयसीआय बँकेच्या निर्णयावर समाजमाध्यमांतून टीका-टिप्पणी सुरू होती. हे पाहता बँकेने घेतलेली ही माघार आहे. नवीन परिपत्रकानुसार, शहरी आणि महानगरांतील ग्राहकांसाठी खात्यात किमान सरासरी शिलकीची मर्यादा रक्कम आता १५,००० रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा १०,००० रुपये होती, त्यात आता झालेली ही ५,००० रुपयांची वाढ आहे.
त्याचप्रमाणे, आयसीआयसीआय बँकेने निम शहरी आणि ग्रामीण ग्राहकांना अनुक्रमे २५,००० आणि १०,००० रुपये किमान शिल्लक ठेवण्याची अटही रद्द केली आहे. त्याऐवजी, त्यांना आता अनुक्रमे ७,५०० रुपये आणि २,५०० रुपये किमान सरासरी शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक ठरेल.
गेल्या आठवड्यात किमान सरासरी शिलकीची आवश्यकता वाढवल्याने बँकेच्या खातेधारकांवर परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. शिवाय या निर्णयामुळे ग्राहकांना त्यांच्या बँकिंग पर्यायांवर पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इंडियन बँकेने बचत खात्यांमध्ये किमान मासिक शिल्लक राखण्यात अयशस्वी ठरविल्याबद्दल खातेदारांवरील दंडात्मक शुल्क माफ केले आहे.