लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (आयएफएससी) शाखा स्थापित केली असून, जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी पहिली योजना प्रस्तुत करण्याचे नियोजनही तिने या निमित्ताने जाहीर केले.

गिफ्ट सिटीतील नोंदणीकृत मालमत्ता व्यवस्थापन संस्था म्हणून नोंदणी प्राप्त यातून आयसीआयसीआय प्रु. एएमसीने मिळविली असून, नियमनानुसार परवानगी असलेल्या विविध प्रतिबंधित योजना/रिटेल योजना/एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आणि अशा तत्सम क्रियाकलापांसाठी निधी व्यवस्थापन उपक्रम तिला यातून हाती घेता येतील.

उद्घाटनप्रसंगी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी नवीन अग्रवाल म्हणाले, भारत त्याच्या विकासपथात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या उंबरठ्यावर आहे. मजबूत लोकसांख्यिकीय लाभ, नागरीकरणाचा वाढलेला वेग, डिजिटल अर्थव्यवस्था आणि दूरगामी धोरणात्मक सुधारणांद्वारे हे घटक या बदलांना पाठबळ देत आहेत. याचे लाभ मिळवू इच्छिणाऱ्या दीर्घकालीन जागतिक गुंतवणूकदारांसाठी ही एक सुसंधी आहे. गिफ्ट सिटीमध्ये शाखेच्या स्थापनेसह, आम्ही गुंतवणूकदारांना समभाग (इक्विटी), निश्चित उत्पन्न पर्याय आणि हायब्रिड प्रस्तुतीद्वारे भारताच्या विकासपथात सहभागी होण्यासाठी एक जागतिक प्रवेशद्वार खुले करत आहोत.

जागतिक मानंदड ठरतील अशा नियामक चौकटीचा वापर करून, गिफ्ट सिटीतील ही शाखा भारताच्या भांडवली बाजारपेठेत अखंड, पारदर्शक आणि कर-कार्यक्षम प्रवेशाचे फायदे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना प्रदान करत राहिल, असे अग्रवाल म्हणाले.

आयसीआयसीआय प्रुडेंशियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ही देशातील एक अग्रगण्य मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. देशातील अव्वल पाच म्युच्यअल फंड घराण्यांपैकी एक असलेली ही कंपनी बचत आणि गुंतवणुकीमधील अंतर भरून काढण्यावर आणि गुंतवणूकदारांसाठी सोप्या आणि संबंधित गुंतवणूक उपायांच्या श्रेणीद्वारे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. सध्या, ICICI बँकेकडे या कंपनीमध्ये ५१ टक्के हिस्सा आहे, तर बहुराष्ट्रीय वित्तीय समूह प्रुडेन्शियलकडे उर्वरित ४९ टक्के हिस्सा आहे.