लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबईः अलिकडे व्याजदर चढे राहिल्याने बँकाच्या चालू व बचत खात्यातील ठेवींमध्ये (कासा) घट होऊ लागली असून, बहुतांश खातेदार मुदत ठेवींकडे वळत आहेत, असा निष्कर्ष ‘फिक्की’ आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांनी गुरूवारी जाहीर केलेल्या पाहणी अहवालातून समोर आला.

कासा ठेवींच्या माध्यमातून बँकांना तुलनेने स्वस्त दरात निधी उपलब्ध होत असतो. बँकेच्या कासा ठेवी जेवढ्या जास्त असतील तेवढा तिची नफाक्षमता अधिक असते. फिक्की आणि इंडियन बँक्स असोएिशनच्या पाहणीनुसार, सध्या कर्जाचे व्याजदर आणि पर्यायाने मुदत ठेवींवरील ग्राहकांना दिले जाणारे व्याजदरही जास्त असल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल मुदत ठेवी राखण्याकडे वाढला आहे. पाहणीत सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक बँकांनी (५७ टक्के) एकूण ठेवींमध्ये कासा ठेवींचे प्रमाण घटल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. याचवेळी मुदत ठेवींमध्ये वाढ झाल्याचेही बँकांनी नमूद केले आहे.

आणखी वाचा-इन्फोसिसचा तिमाही नफा ६,२१५ कोटींवर; सप्टेंबरअखेर तिमाहीत ३.१ टक्के वाढ

दुसरीकडे पायाभूत सुविधा, वस्त्रोद्योग आणि रसायने या क्षेत्रातील दीर्घकालीन कर्जाची मागणी सातत्याने वाढत आहे. अन्न प्रक्रिया आणि लोह व पोलाद यासारख्या धातू क्षेत्रातूनही मागील सहा महिन्यांत दीर्घकालीन कर्ज वितरण वाढल्याचे दिसून आले आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात कर्जवितरण वाढल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी ६७ टक्के घटकांनी नोंदविले. या आधीच्या सर्वेक्षणात ही संख्या ५७ टक्के होती. बिगरखाद्य क्षेत्रातील कर्ज वितरणातील वाढ पुढील सहा महिने आशादायी राहील, असाही अंदाज आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के बँकांनी बिगरखाद्य क्षेत्रात कर्ज वितरणातील वाढ १२ टक्क्यांपेक्षा अधिक असेल, असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थकीत कर्जांमध्ये घट

मागील सहा महिन्यांत थकीत कर्जांमध्ये घट झाल्याचे निरीक्षण ७५ टक्के बँकांनी नोंदविले आहे. मागील सर्वेक्षणात ९० टक्के बँकांनी त्यात घट झाल्याचे म्हटले होते. याचबरोबर या सर्वेक्षणात सार्वजनिक क्षेत्रातील ९० टक्के बँकांनी आणि खासगी क्षेत्रातील ८० टक्के बँकांनी थकीत कर्जांमध्ये घट झाल्याचे म्हटले आहे. पुढील सहा महिने एकूण थकीत कर्जांचे प्रमाण ३ ते ४ टक्के असेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.