वाहनांची ग्राहकांकडून मागणी कमी होत असताना एप्रिलमध्ये वाहन निर्मात्यांकडून वितरकांना पाठवल्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४ टक्क्यांनी वाढ होऊन, ती ३.४९ लाखांवर पोहोचली, अशी माहिती वाहन निर्मात्यांची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)’ने गुरुवारी दिली.
एप्रिल २०२४ मध्ये एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री ३.३५ लाख होती. तर एप्रिल २०२५ मध्ये ३.४९ लाख वाहनांची विक्री नोंदवली गेली आहे, एप्रिल २०२४ च्या तुलनेत त्यात ३.९ टक्के अधिक राहिली, असे सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या महिन्यात एकूण दुचाकी वाहनांच्या विक्रीत १७ टक्क्यांनी घट होऊन ती १४.५८ लाखांवर मर्यादित राहिली. एप्रिल २०२४ मध्ये दुचाकी, स्कूटर आणि मोपेडची घाऊक विक्री १७.५१ लाख नोंदवली गेली होती. गेल्या महिन्यात स्कूटरची विक्री ५.४८ लाखांवर मर्यादित राहिली, जी एप्रिल २०२४ मधील ५.८१ लाख स्कूटरच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घटली आहे. एप्रिलमध्ये मोटारसायकलची विक्री वार्षिक आधारावर २३ टक्क्यांनी घसरून ७.७१ पर्यंत खाली घसरली आहे.
वाहन निर्मिती उद्योगाने एप्रिल २०२५ पासून दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स (ओबीडी) २ नियमनाच्या या दुसऱ्या टप्प्यातील नवीन नियामक व्यवस्थेत सहजतेने संक्रमण केले आहे, तसेच या महिन्यापासून देशभरात ई-२० अनुपालन करणाऱ्या दुचाकींची विक्री सुरू केली आहे, असे मेनन यांनी सांगितले.