हंसलपूर (गुजरात) : जपानमधील वाहननिर्मिती क्षेत्रातील सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने पुढील पाच ते सहा वर्षांमध्ये भारतात ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन मंगळवारी जाहीर केले. कंपनीचे संचालक व अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी ही घोषणा करताना, इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, कंपनीचे नेतृत्व यासह भारतीय बाजारपेठेबद्दल आशावादी दृष्टिकोनही स्पष्ट केला.
मारूती सुझुकी इंडियाच्या केवळ निर्यात बाजारपेठेसाठी विकसित पहिल्या इलेक्ट्रिक मोटार ई-व्हिटाराच्या जगभरात १०० देशांमध्ये निर्यातीच्या सुरुवातीची औपचारिक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते कंपनीच्या लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या प्रकल्पातून हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी निर्मिती होणार आहे.
याप्रसंगी तोशिहिरो सुझुकी म्हणाले की, सुझुकी पुढील ५ ते ६ वर्षांत भारतात ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गेल्या चार दशकांपासून सुझुकीची भारतातील वाहन क्षेत्रात भागीदारी आहे आणि सुझुकीसाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला भारतच तिच्यासाठी जागतिक उत्पादनाचे केंद्रही बनण्याच्या स्थितीत आहे. भारताच्या हरित वाहन आणि विकसित भारत संकल्पाच्या दिशेने कंपनी वाटचाल करीत आहे.
यावेळी मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर.सी.भार्गव म्हणाले की, कंपनीने वर्षाला ४० लाख मोटारींचे उत्पादन करण्याची क्षमता गाठण्याचे ध्येय निश्चित केले आहे. ते गाठण्यासाठी कंपनी गुंतवणूक करणार आहे. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा आणि संशोधन व विकासासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. याचबरोबर नवतंत्रज्ञानासाठीही मोठी गुंतवणूक करावी लागेल.
स्वदेशी वस्तूंच्या खरेदीचे पंतप्रधानांचे आवाहन
पुढील आठवड्यात नियोजित जपानच्या दौऱ्यावर जात असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ई-व्हिटारासह, जपानी कंपनीच्या गुंतवणुकीतून उभा राहिलेला हा गुजरातमधील प्रकल्प सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उद्दिष्टाच्या दिशेने एक मोठी झेप आहे. पंतप्रधानांनी या निमित्ताने स्वदेशीचा आग्रह धरत, लोकांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, गुंतवणूक कुठून आली आहे याची पर्वा न करता, भारतीय भूमीवर बनविल्या गेलेल्या कोणत्याही वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले जावे, यामध्ये मारुतीच्या गाड्यांचाही समावेश आहे.
आतापर्यंत १ लाख कोटींची गुंतवणूक
मारूती सुझुकी इंडिया ही जपानच्या सुझुकी या जागतिक समूहाचा भाग आहे. भारत ही सुझुकीसाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि गेल्या अनेक दशकांपासून भारतातील सर्वात प्रमुख प्रवासी वाहन निर्माती म्हणून मारुती सुझुकीचा वरचष्मा राहिला आहे. सुझुकीने आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारतात केली आहे. यातून मूल्य साखळीत ११ लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. आता कंपनीच्या गुजरामधील प्रकल्पातून ई-व्हिटाराचे उत्पादन केवळ निर्यातीसाठी केले जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत ही मोटार प्रस्तुत करण्याचे नियोजन अद्याप कंपनीने केलेले नाही.