मुंबईः रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि गृहनिर्माण क्षेत्रातील सरकारचा वाढता भांडवली खर्च, फर्निचर उत्पादनातील वाढती मागणी आणि घराघरात वाढती ‘डू इट युअरसेल्फ (डीआयवाय)’ संस्कृती यामुळे भारतातील हँड टूल्स, पॉवर टूल्स अशी अवजारे आणि बंध सामग्री (फास्टनर्स) बाजारपेठेत वाढ होत आहे, असा उद्योगप्रमुखांचा अंदाज आहे.
भारतातील हँड टूल्स अर्थात हस्त अवजारांची बाजारपेठ ही २०२४ मध्ये सुमारे ८२.६ कोटी डॉलरच्या तुलनेत, २०३३ पर्यंत १२२ कोटी अमेरिकी डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर, २०२५ मध्ये १८५ कोटी डॉलरच्या घरात असलेल्या पॉवर टूल्स बाजारपेठेची उलाढाल वार्षिक ७.८ टक्क्यांच्या चक्रवाढ दराने २०३५ पर्यंत दुप्पट होऊन ३८० कोटी डॉलरवर जाण्याची अपेक्षा आहे.
इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाने मुंबईत आयोजित केलेल्या हँड टूल्स अँड फास्टनर्स एक्स्पो (एचटीएफ) च्या उद्घाटनानिमित्त उपस्थित उद्योगांतील प्रमुखांनी वरील अंदाज व्यक्त केला. प्रदर्शनाने १५० हून अधिक आघाडीच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडना एकत्र आणले आणि तीन दिवसांत देशा-परदेशातील ८,००० हून व्यावसायिक प्रतिनिधींनी त्याला हजेरी लावली.
याप्रसंगी ओशो टूल्स प्रा. लि. चे विपणन प्रमुख राजेश पेशिओन म्हणाले, करोना महासाथीनंतर, हँड टूल्स आणि पॉवर टूल्स क्षेत्राला उभारी आणि देशाच्या आयातपर्यायी स्वावलंबनासाठी देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन म्हणून सरकारने ३,००० कोटींच्या समूह विकास योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे आयात अवलंबित्व कमी होईल, देशातील मूल्य टिकून राहील आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास म्हणाले, वाढीच्या क्षमता लक्षात घेता आणि आयातीला पर्यायी उत्पादनासाठी, केंद्र सरकार स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहित करत असल्याचे दिसून येते. ज्याला गती मिळत असून, या उद्योगाला निर्यात व्यवसायातही खूप मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.