नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या मे महिन्यामध्ये ५.२ टक्क्यांपुढे मजल मारल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. हा देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र औद्योगिक उत्पादनात घसरण झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२२ मध्ये १९.७ टक्के वाढ नोंदवली गेली होती.
हेही वाचा >>> ‘टीसीएस’चा नफा ११,०७४ कोटींवर; एप्रिल ते जून तिमाहीत १६.८ टक्के वाढ
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या निर्देशांकातील महत्त्वाचा घटक म्हणजे निर्मिती क्षेत्राने मे महिन्यात ५.७ टक्के वाढ नोंदवली आहे. जे वर्षभरापूर्वी २०.७ टक्क्यांनी वाढले होते. खाणकाम तसेच वीजनिर्मिती क्षेत्राने अनुक्रमे ६.४ आणि ०.९ टक्के दराने वाढ साधली आहे. वीजनिर्मिती क्षेत्राने गेल्यावर्षी याच कालावधीत २३.५ टक्के वाढ नोंदवली होती.
हेही वाचा >>> सेन्सेक्समध्ये २२४ अंशांची घसरण
मे महिन्यात ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात केवळ १.१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली, जिचे वाढीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या मे महिन्यात ५९.१ टक्के राहिले होते. भांडवली वस्तू क्षेत्र देखील ८.२ टक्के विस्तारले आहे. जे मे २०२२ मध्ये ५३.३ टक्के दराने वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील एप्रिल-मे कालावधीत, औद्योगिक उत्पादनातील वाढ ४.८ टक्के आहे, जी एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीतील १२.९टक्क्यांवरून खाली आली आहे.
हेही वाचा >>> आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना ७,५३२ कोटी रुपये निधी जारी
मार्च २०२० मध्ये करोनाकाळात औद्योगिक उत्पादन दर (उणे) १८.७ टक्क्यांपर्यंत आक्रसला होता. तर एप्रिल २०२० मध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी सुरू असल्यामुळे उत्पादन दर (उणे) ५७.३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. औद्योगिक निर्देशांकाला कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व असते. ते देशाच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक विकास कोणत्या वेगाने होत आहे, याचे निदर्शक असते.
