पीटीआय, नवी दिल्ली
देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादनवाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ४ टक्क्यांवर स्थिर राहिल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक असलेल्या या निर्देशांकाने, मुख्यतः उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे ४ टक्के दर गाठला.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या संदर्भात मोजले जाणारे कारखाना उत्पादन गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२४ मध्ये ३.२ टक्क्यांनी वाढले होते. त्यातुलनेत यंदा त्यात वाढ झाली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ), गेल्या महिन्यासाठी जाहीर केलेला ४ टक्क्यांचा तात्पुरत्या अंदाज सुधारून घेत, ऑगस्ट २०२५ साठी औद्योगिक उत्पादन वाढीचा दर ४.१ टक्के असल्याचे जाहीर केले. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये उत्पादन क्षेत्रातून ४.८ टक्के दराने उत्पादन वाढले, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४ टक्के होते. तर खाण उत्पादन उणे ०.४ टक्क्यांपर्यंत घटले आहे, जे गेल्या वर्षी ०.२ टक्के होते.
सप्टेंबर २०२५ मध्ये वीज उत्पादन ३.१ टक्क्यांनी वाढले, तर मागील वर्षी ते ०.५ टक्क्यांवर मर्यादित होते. विद्यमान आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीत देशाचे औद्योगिक उत्पादन ३ टक्क्यांनी वाढले, जे २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीत ४.१ टक्के नोंदवले गेले होते. सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत सप्टेंबर २०२५ मध्ये २३ पैकी १३ उद्योगगटांनी सकारात्मक वाढ नोंदवली आहे.
भांडवली वस्तू विभाग सप्टेंबर २०२५ मध्ये ४.७ टक्क्यांनी वाढला, जो मागील वर्षीच्या कालावधीत ३.५ टक्के पातळीवर होता. सप्टेंबर २०२४ मध्ये ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन ६.३ टक्के होते, ज्यातील उत्पादन सप्टेंबर २०२५ मध्ये २.९ टक्क्यांपर्यंत घटले आहे. पायाभूत सुविधा/बांधकाम सामग्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये १०.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ३.५ टक्के होती. आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, सप्टेंबर २०२५ मध्ये प्राथमिक वस्तूंचे उत्पादन १.४ टक्क्यांनी वाढले आहे, जे गेल्या वर्षी १.८ टक्के पातळीवर होते.
