मुंबई : देशात डिजिटल बँकांचा वापर वाढतो आहे. त्याचबरोबर डिजिटल माध्यमातून फसवणूक करणाऱ्या भामट्यांची संख्या देखील वाढ असल्याने बँक ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ‘लॉक एफडी’ ही नवीन सुविधा बाजारात आली आहे. याअंतर्गत जे बँक ग्राहक डिजिटल माध्यमाचा जास्त उपयोग करत नाही किंवा त्याबाबत अधिक माहिती नसलेल्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.
देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने ‘लॉक एफडी’ ही एक नाविन्यपूर्ण आणि उद्योगातली पहिली सुविधा सुरू केल्याची मंगळवारी घोषणा केली. ग्राहकांच्या मुदत ठेवींना वाढत्या डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. बँकेच्या ‘ओपन’ या मोबाइल अॅपवर आणि सर्व शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून, ग्राहकांना मोबाइल किंवा इंटरनेट बँकिंगसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे मुदत ठेव अकाली बंद करता येऊ नये, यासाठी हे एक अतिरिक्त सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
‘लॉक एफडी’ ही सुविधा ग्राहकांच्या मुदत ठेवींना डिजिटल फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आणलेली एक सुरक्षा यंत्रणा आहे. या सुविधेसाठी निवड करणाऱ्या ग्राहकांना त्यांची मुदत ठेव अकाली बंद करायची असल्यास थेट बँकेच्या शाखेत जावे लागेल. एकदा ठेवीवर लॉक लावल्यास डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ती बंद करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. ग्राहकांनी बॅंकेच्या शाखेत जाऊन ओळखीची तपासणी करून घेतल्यावर त्यांच्या मुदत ठेवींवर प्रक्रिया करण्यात येईल. यामुळे त्यांच्या ठेवींमध्ये अनधिकृतरित्या हस्तक्षेप होण्याचा धोका कमी होईल. ही सुविधा विशेषतः अशा ग्राहकांसाठी उपयुक्त आहे, जे डिजिटल प्लॅटफॉर्मचा कमी वापर करतात किंवा ज्यांना अशा माध्यमांतील फसवणुकीचा धोका अधिक असतो.
ॲक्सिस बँकेत डिजिटल उपाययोजनांमध्ये सतत गुंतवणूक करीत असतो. त्यामुळे सुरक्षित आणि अखंड बँकिंगचा अनुभव ग्राहकांना मिळतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘लॉक एफडी’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. वाढत्या डिजिटल फसवणुकीला बँकेकडून दिलेले हे एक खणखणीत उत्तर आहे. या सुविधेमुळे ग्राहकांच्या मुदत ठेवींमध्ये अनधिकृत व डिजिटल हस्तक्षेप होण्यापासून संरक्षण मिळते. ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या ठेवींमधील निधी चोरून नेण्याचा चोरट्यांचा मार्ग बंद करून ग्राहकांचे पैसे आता अधिक सुरक्षित झाले आहे, असे बँकेचे डिजिटल बिझनेस, ट्रान्सफॉर्मेशन आणि स्ट्रॅटेजिक प्रोग्रॅम्स या विभागांचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह समीर शेट्टी म्हणाले.
‘लॉक एफडी’ ही सुविधा ॲक्सिस बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असून, ती ॲक्सिस बँकेच्या मोबाइल अॅपवरून किंवा कोणत्याही शाखेतून सक्रिय करता येते. ॲक्सिस बँकेने अलीकडेच आपल्या मोबाइल अॅपवर ‘इन-अॅप मोबाइल ओटीपी’ ही सुविधादेखील सुरू केली आहे. ग्राहकांची प्रमाणीकरणाची सुरक्षितता यातून अधिक बळकट होते आणि ओटीपीशी संबंधित वाढत्या फसवणुकींपासून ग्राहकांचे संरक्षण होते. डिजिटल फसवणुकीविरोधात लढा देत असताना ग्राहकांचा डिजिटल अनुभव अधिक समृद्ध करणे हा या सर्व उपक्रमांचा उद्देश आहे.