नवी दिल्ली : ग्राहकांना विमा कवचाची (सम अश्युअर्ड) रक्कम, विम्यातून वगळलेल्या गोष्टी आणि दाव्यांची प्रक्रिया आदी मूलभूत गोष्टींची माहिती सहजसोप्या भाषेत देणे विमा कंपन्यांसाठी बंधनकारक होणार आहे. या नवीन नियमाची अंमलबजावणी नववर्षरंभापासून, म्हणजे १ जानेवारी २०२४ पासून होणार आहे.

भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) याबाबत सर्व विमा कंपन्यांना उद्देशून परिपत्रक काढले आहे. आधीच्या नियमांत सुधारणा करून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. यानुसार, ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीचे मूलभूत माहितीचे तपशील त्यांना समजतील, अशा प्रकारे विमा कंपन्यांना द्यावे लागतील. ग्राहक माहिती तपशिलाच्या या सुधारित नियमांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२४ पासून होणार आहे. ही माहिती ग्राहकाला हवी असल्यास स्थानिक भाषेतही उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

हेही वाचा… रद्दबातल सिंगूर नॅनो प्रकल्प : टाटा मोटर्सला पश्चिम बंगाल सरकारकडून ७६६ कोटींची भरपाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॉलिसीची कागदपत्रे ही कायदेशीर व तांत्रिक भाषेत असतात. त्यामुळे ग्राहकांना सोप्या भाषेत पॉलिसीची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यांना पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे आणि त्यातून वगळलेल्या गोष्टी या आवश्यक बाबींची माहिती मिळणे गरजेचे आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे. अनेक कंपन्या ग्राहकांना पुरेशी माहिती देत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना पॉलिसीच्या माहितीचे तपशील देऊन त्यावर त्यांची पोचही विमा कंपन्या, मध्यस्थ आणि एजंटांना घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा… झी एंटरटेन्मेंटचे पुनीत गोएंका यांना दिलासा, महत्त्वाच्या पदधारणेविरुद्ध निर्बंध रद्दबातल

पॉलिसी ग्राहकांना मिळणारी माहिती

  • विमा कवचाची रक्कम
  • विम्यातून वगळलेल्या गोष्टी
  • प्रतीक्षा कालावधी
  • विमा संरक्षणाची मर्यादा
  • दाव्यांची प्रक्रिया
  • तक्रार निवारण प्रक्रिया