वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीबाबतचा अंदाजात ६.४ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. निवळत असलेल्या जागतिक अनिश्चिततेसह, भारत-अमेरिका व्यापार तणाव कमी झाल्यामुळे या आंतरराष्ट्रीय संस्थेने विकासदर अंदाज २० आधारबिंदूंनी वाढविला आहे.
‘आयएमएफ’ने मंगळवारी २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन्ही आर्थिक वर्षांसाठी जीडीपी वाढीचा अंदाज सुधारून ६.४ टक्क्यांवर नेला आहे. जागतिक अर्थव्यवस्था देखील एप्रिलमध्ये विविध संघटनांनी भाकित केलेल्या अंदाजापेक्षा किंचित वेगाने विस्तारत असल्याचे दिसून आले आहे.
सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने ६.५ टक्के दराने विकास साधला. मात्र ही चार वर्षांतील नीचांकी पातळी आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात ६.५ टक्क्यांनी जीडीपी वाढण्याची अपेक्षा केली आहे. तर अर्थमंत्रालयाने तो ६.३ टक्के ते ६.८ टक्क्यांच्या श्रेणीत अंदाज वर्तवला आहे. तर आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी, रिझर्व्ह बँकेचा अंदाज ६.७ टक्क्यांचा आहे.
सरलेला एप्रिलमध्ये, आयएमएफने २०२५-२६ साठी भारताच्या विकास दराचा अंदाज ३० आधारबिंदूंनी कमी कमी करून ६.२ टक्के केला होता आणि २०२६-२७ साठी तो २० आधारबिंदूंनी खाली आणत ६.३ टक्के केला होता. मुख्यतः अमेरिकेच्या अतिरिक्त कराचे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता या अंदाजांमागे होती. मात्र अमेरिकेने छेडलेले शुल्क युद्धाचा धोका आता लक्षणीय कमी झाला आहे, असे आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ पिएरे-ऑलिव्हियर गौरिंचास म्हणाले. शिवाय, जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये देखील सुधारणा झाली आहे.
विद्यमान वर्षात जानेवारीपासून अमेरिकी डॉलर सुमारे ८ टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. जागतिक जीडीपी २०२५ मध्ये ३ टक्के आणि २०२६ मध्ये ३.१ टक्के वाढेल, जे एप्रिलमध्ये भाकित केलेल्या अनुक्रमे २.८ टक्के आणि ३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणाबाबत आयएमएफने सावधगिरीचा इशारा दिला आहे.