लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सरलेल्या एप्रिलमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात भांडवली बाजाराने वाढ नोंदवली. तर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये सुमारे ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये एप्रिल महिन्यात १०.५३ लाख कोटींची भर पडली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन, नैर्ऋत्य मान्सून सामान्यपेक्षा अधिक बरसण्याची शक्यता आणि भारत-अमेरिका व्यापार करार यशस्वी होण्याच्या आशावादामुळे बाजाराला चालना मिळाली आहे. गेल्या महिन्यात सेन्सेक्स २,८२७.३२ अंशांनी म्हणजेच ३.६५ टक्क्यांनी वधारला आहे, तर याच कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ८१४.८५ अंशांची (३.४६ टक्के) भर घातली आहे. परिणामी, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात १०.३७ लाख कोटी रुपयांची भर पडली. एकूण सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४२३.२४ लाख कोटी (४.९८ ट्रिलियन डॉलर) रुपयांवर पोहोचले आहे.
प्रमुख निर्देशांकांनी सलग दुसरी मासिक वाढ नोंदवली आहे. मार्चमध्ये सेन्सेक्स ४,२१६.८२ अंशांनी (५.७६ टक्के) आणि निफ्टी १,३९४.६५ अंशांनी (६.३० टक्के) वधारला होता. ९ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ आधारबिंदूंची कपात करून रेपोदर ६ टक्क्यांपर्यंत कमी केला. परिणामी बाजारातील भावना अधिक बळकट झाल्या. पुढील महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपोदर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी शेअर बाजारात घसरण
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत वाढलेल्या तणावामुळे पाकिस्तान शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. भारताकडून पाकिस्तानवर लष्करी हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे, अनिश्चिततेमुळे पाकिस्तान शेअर बाजाराचा निर्देशांक केएसई १०० मध्ये ३ टक्क्यांहून अधिक म्हणजेच ३,५०० अंशांची घसरण झाली. तो १,११,३२६ अंशांवर बंद झाला. भारत पुढील २४-३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे, असा दावा तेथील माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी केल्याने अनिश्चिततेत भर घातली. परिणामी, गेल्या काही सत्रात केएसई १०० निर्देशांक ६.४० टक्क्यांनी घसरला आहे.