Oil Price Spike: मध्य-पूर्व आशियात इस्रायल व इराणमध्ये युद्धाचा भडका उडालेला असताना त्याचा थेट परिणाम जगभरातल्या देशांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या युद्धामुळे तेलाचे साठे धोक्यात आले असून एकमेकांकडून तेलाच्या साठ्यांनाच लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या उत्पादनावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच इस्रायल-इराण युद्धाचे परिणाम भारतालाही भोगावे लागण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या
इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. मंगळवारी या किमती तब्बल ४ टक्क्यांनी वाढल्यामुळे त्यावरून जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. हा संघर्ष अधिक न वाढता लवकराच लवकर शांत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंगळवारच्या दरवाढीनंतर बुधवारीही तेलाच्या किमती वाढल्याचं दिसून आलं. ब्रेंट तेलाच्या किमी १९ सेंट्स किंवा ०.२५ टक्क्यांनी वाढून ७६.६४ डॉलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत. दुसरीकडे यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडियेएटच्या तेलाच्या किमती २३ सेंट किंवा ०.३१ टक्क्यांनी वाढून ७५.०७ डॉलर्सपर्यंत वाढल्या आहेत.
तेल उत्पादनासाठी इराण का महत्त्वाचा?
इस्रायल-इराण संघर्ष चिघळल्यामुळे इराणमधील तेल उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. ओपेक अर्थात जगभरातल्या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेसाठी इराण हा तिसरा मोठा तेल उत्पादक देश आहे. इराणमध्ये दिवसाला ३३ लाख बॅरल इतकं कच्च्या तेलाचं उत्पादन केलं जातं. हे प्रमाण अवघ्या जगाच्या समुद्री तेलाच्या मागणीच्या तब्बल एक पंचमांश इतकं आहे. त्यामुळे इराणमधील तेल उत्पादनावर होणारा परिणाम हा अवघ्या जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, एकीकडे इराणमधून होणाऱ्या तेलाच्या उत्पादनावर परिणाम झालेला असताना दुसरीकडे ओपेकमधील इतर देश त्यांच्या राखीव उत्पादन क्षमतेचा वापर करून अतिरिक्त तेल उत्पादन करू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्यातून इराणमधील कमी उत्पादित होणाऱ्या तेलाची कसर भरून काढली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे.
इराण-इस्रायलमधील संघर्ष विकोपाला
दरम्यान, इराण व इस्रायलमधील संघर्ष आता विकोपाला गेल्याचं दिसत आहे. अमेरिकेनं इराणला विनाअट शरणागतीचा इशारा दिला आहे. तसेच, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी कुठे लपून बसले आहेत, ते आपल्याला माहिती आहे, पण सध्यातरी आपण त्यांना मारणार नाही, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. त्यानंतर खोमेनी यांनी ‘आता युद्ध सुरू’ असा इशारा देत इस्रायलवरील हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायलकडूनही इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे.