पीटीआय, गेडन

भारतातील व्यवसाय वाढीच्या शक्यतांमुळे, जग्वार लँड रोव्हरने (जेएलआर) आगामी तीन ते चार वर्षांत व्यवसाय दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील काही वर्षांत भारतातील आलिशान प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत सातत्याने वाढ अपेक्षित असल्याने, कंपनीला भारतातील व्यवसायात वाढीच्या मोठ्या आशा आहेत.

भारतात बीस्पोक अर्थात सानुकूल वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असलेल्या मोटारी किंवा वेगळ्या धाटणीच्या प्रवासी वाहनांची मागणी सतत वाढते आहे. गेल्या काही वर्षांत जेएलआर इंडियाने केलेली सरस विक्री पाहता, पुढेही हा वाढीचा दर टिकून राहण्याची आशा आहे, असे जेएलआर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन अंबा म्हणाले. दरवर्षी ८,००० हजारांहून अधिक वाहनांच्या मागणीची नैसर्गिक क्षमता आहे, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६,००० वार्षिक विक्रीचा टप्पा आधीच ओलांडला गेला आहे. पुढील ३-४ वर्षांत, देशात व्यवसायाचे आकारमान आणि महसूल या दोन्ही बाबतीत दुप्पट लक्ष्य पूर्ण करू शकू, असे अंबा म्हणाले.

जेएलआर इंडियाने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६,१८३ वाहनांची विक्री करून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, जी आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत ४० टक्के अधिक आहे. त्याचप्रमाणे, वितरकांना पाठवण्यात आलेल्या वाहनांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी वाढून ६,२६६ वाहनांवर पोहोचले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वितरण विस्तार

कंपनीने २०३० पर्यंत विक्री दुप्पट करून सुमारे ५० नवीन विक्री आस्थापने वाढवण्याची योजना आखली आहे. राजकोट, गोवा आणि नागपूरसारख्या ठिकाणी नवीन वितरक नेमण्यात आले आहेत. जेएलआर विक्री जाळे सध्या भारतातील २१ शहरांमध्ये पसरलेले आहे असून, २५ अधिकृत दालनांच्या माध्यमातून वाहनांची विक्री केली जाते. कंपनी देशात रेंज रोव्हर बीईव्ही, रेंज रोव्हर एसव्ही ब्लॅक, रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही ब्लॅक, डिफेंडर ओसीटीए ब्लॅक आणि डिफेंडर ट्रॉफी सारख्या मोटारींच्या विक्रीची योजना आखत आहे. जेएलआर इंडिया सध्या देशात रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट, रेंज रोव्हर वेलार, रेंज रोव्हर इव्होक, डिफेंडर, डिस्कव्हरी आणि डिस्कव्हरी स्पोर्ट विकते.