पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत १२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
इंटरनल कॉम्बशन इंजिन, जनित्र संच आणि कृषी उपकरणे क्षेत्रातील किर्लोस्कर ऑईल इंजिन्स ही आघाडीची कंपनी आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत १ हजार ४३४ कोटी रुपयांची निव्वळ विक्री नोंदविली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही विक्री १ हजार ३३४ कोटी रुपये होती. त्यात आता ८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचे कर व व्याजपूर्व उत्पन्न १९० कोटी असून, त्यात ९ टक्के वाढ झाली आहे. याचवेळी कर व व्याजपूर्व नफा १३.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १३ टक्के होता.
याबाबत किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका गौरी किर्लोस्कर म्हणाल्या की, कंपनीने पहिल्या तिमाहीत निव्वळ विक्रीचा १ हजार ४३४ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. यामुळे आर्थिक वर्षाची मजबूत सुरुवात झाली आहे. अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रात. आम्ही नवीन उत्पादने सादर केली आहेत. त्यांना बाजारपेठेतून चांगली मागणी आहे.