what may get cheaper in new GST system : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जीएसटी कररचनेत मोठे सुधार करण्याची घोषणा केली होती. आता देशभरातील कर कमी करण्याची वेळ आली आहे. ही आता काळाची मागणी आहे, पुढच्या पिढीसाठी जीएसटीची पुनर्रचना केली जावी, असे ते म्हणाले होते. या सुधारणांमध्ये काही जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. या सुधारणांमध्ये पॅसेंजर वाहने आणि दुचाकी यांच्यावरील कर देखील कमी होण्याची अपेक्षा आहे.

एनडीटीव्हाने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार जीएसटी सुधारणांमध्ये ५ टक्के आणि १८ टक्के असे दोन ब्रॅकेट प्रस्तावित आहेत. आणि १२ आणि २८ टक्क्यांच्या ब्रॅकेटमध्ये येणाऱ्या वस्तू आता या दोन्हीपैकी एका ब्रॅकेटमध्ये टाकल्या जाणार आहेत.

सूत्रांनी असेही सांगितले की, सरकार सध्या २८ टक्के जीएसटी असलेल्या ९० टक्के वस्तूंवरूल जीएसटी कमी करून त्या वस्तूंना १८ टक्क्यांच्या ब्रॅकेटमध्ये टाकण्याची योजना आखत आहे. तर आत्ता १२ टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंवर फक्त ५ टक्के कर आकारला जाईल.

पाच टक्क्यांच्या ब्रॅकेटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे. याबरोबरच काही वस्तूंवर ४० टक्के विशेष ‘sin tax’ लावण्यात येणार आहे, ज्यामध्ये तंबाखूजन्य उत्पादनांचा समावेश असेल. या यादीत फक्त ५ ते ७ वस्तूंचा समावेश असेल असेही सूत्रांनी सांगितले. मुळात अशा पदार्थांवर आधीपासूनच प्रचंड कर लावण्यात आलेले असतात.

यासह इतर काही वस्तू जसे की हिरे आणि मौल्यवान रत्न यांच्यावर सध्या आहे तेवढाच कर असणार आहे. तर पेट्रोलियम उत्पादने हे जीएसटी कक्षेच्या बाहेरच ठेवली जाणार आहेत.

जीएसटीमध्ये या सुधारणा केल्यानंतर वापर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान जीएसटी काउंन्सीलच्या सप्टेबर महिन्यातील बैठकीनंतर याबद्दल अंतिम निर्णय होईल. या बदलांमुळे उत्पादनात जवळपास ५०,००० कोटी रुपयांचा खड्डा पडण्याची शक्यता आहे.

काय स्वस्त होणार?

दररोजच्या वापरातील वस्तू या स्वस्त होतील, पण नेमकं काय स्वस्त होणार याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. जुलैमध्ये सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले होते की, यामध्ये टूथपेस्ट, छत्री आणि लहान वस्तू जसे की शिलाई मशिन, प्रेशर कुकर आणि लहान वॉशिंग मशिन या वस्तूंचा समावेश असेल.

सायकल, तयार कपडे (ज्यांची किंमत १,००० रुपयांपेक्षा जास्त आहे), फुटवेअर (५०० रुपये ते १,००० रुपयांच्या दरम्यानचे) याचा देखील त्यामध्ये समावेश आहे. याबरोबरच लसी, सिरॅमिक टाइल्स आणि शेतीची अवजारे यांचा देखील समावेश होऊ शकतो.

याबरोबरच मोबाइल फोन्स आणि संगणक, हेअर ऑइल, प्रक्रिया केलेले अन्न आणि स्टेशनरी वस्तू जसे की कंपास आणि वह्या यांचा देखील समावेश असू शकतो.

१८ टक्क्यांमध्ये काय असेल?
टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशिन आणि aerated पाणी याबरोबरच बांधकाम क्षेत्रात वापरलं जाणारं काही साहित्य जसेच के रेडी मिक्स कॉन्क्रिट आणि सिमेंट हे देखील नव्याने १८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंच्या यादीत जाईल.

कार आणि दुचाकींचं काय?

सध्या पॅसेंजर वाहनांवरील कर त्यांची इंजिनची क्षमता, लांबी आणि बॉडीचा प्रकार यानुसार २८ टक्के जीएसटी अधिक भरपाई उपकर यासह २२ टक्क्यांवर आहे. तसेच कुठलाही भरपाई उपकराशिवाय इलेक्ट्रिक कारवर ५ टक्के कर आहे.

दुचाकींसाठी कर हा २८ टक्के आहे. ३५० सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींच्या मॉडेल्सना भरपाई उपकर नाही. तर यापेक्षा जास्त असलेल्यांना ३ टक्के सेस द्यावा लागतो.

सुधारित जीएसटी स्ट्रक्चरमध्ये २८ टक्क्यांची श्रेणीच काढून टाकली गेली तर, कार आणि दुचाकी यांच्या किंमती १८ टक्क्यांच्या ब्रॅकेटमध्ये येतील, ज्यामुळे त्या १० टक्क्यांनी स्वस्त होतील. पण या संबंधीची पूर्ण सविस्तर यादी, म्हणजे कोणत्या वस्तूवर किती जीएसटी आकारला जाईल हे, पुढे जाहीर केले जाईल.