वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ट्विटरची प्रतिस्पर्धी भारतीय कंपनी ‘कू’देखील सध्या अडचणीत आली आहे. कंपनीने ३० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा वाढत चाललेला तोटा आणि निधी उभारणी करण्यात अपयश आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. कू या स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग उपयोजनाचे एकूण मनुष्यबळ २६० असून, त्यातील ३० टक्के कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

टायगर ग्लोबलचे या कंपनीला आर्थिक पाठबळ आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, जागतिक पातळीवर सध्या वाढीपेक्षा कार्यक्षमतेला प्राधान्य आहे. व्यवसायांनी आता आर्थिक गणित सांभाळत वाटचाल करायला हवी. कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना समर्पक भरपाई देण्यात आली आहे. त्यांना आरोग्यविषयक सुविधा देण्यात आल्या असून, नवीन रोजगार शोधण्यासाठी त्यांना मदत केली जात आहे.

हेही वाचा – देशातील आघाडीची आयटी कंपनी आता विकणार पीठ, तांदूळ, डाळ; अंबानी-अदाणींच्या कंपन्यांशी स्पर्धा करणार

‘कू’ ॲपचे सहा कोटींहून अधिक डाऊनलोड असून, कंपनीकडे पुरेसे भांडवल आहे. कंपनी नवीन प्रयोग करीत फायदा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे कंपनीचे सहसंस्थापक मयांक बिडवाटका यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते. प्रत्येक वापरकर्त्यामागे सर्वाधिक महसूल मिळवणारी कू हे सर्वोत्तम समाजमाध्यम व्यासपीठ असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. कंपनीचे ॲक्सेल आणि कलारी कॅपिटल हे गुंतवणूकदार आहेत. त्यांनी मागील वर्षी २७.३ कोटी डॉलरचा निधी उभा केला होता.

हेही वाचा – ‘झी’कडून बँकांशी बोलणी सुरू; ‘सोनी’तील विलीनीकरणाला गतिमानता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटर-सरकार वाद ठरला होता फायद्याचा

सुरुवातीच्या काळात बंगळुरुस्थित ‘कू’ला ट्विटरचा भारतीय यंत्रणांशी झालेला वाद फायद्याचा ठरला होता. यामुळे सरकारी अधिकारीच नव्हे, तर क्रिकेटपटू, चित्रपट अभिनेते, अभिनेत्री वगैरे वलयांकित वर्तुळ हे ‘कू’सारख्या स्वदेशी पर्यायाकडे वळले होते.