मुंबईः सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी लिमिटेडने शुक्रवारी जाहीर केलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या आर्थिक कामगिरीत, निव्वळ नफ्यात ३.८ टक्क्यांची घट नोंदवली आहे. इतर उत्पन्नांत घट आणि कुटुंब निवृत्तिवेतनावर वाढीव खर्चामुळे सरलेल्या तिमाहीत तिचा नफा ७,६२१ कोटी रुपयांवर घसरला आहे. कंपनीने वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ७,९२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

एलआयसीचे निव्वळ हप्त्यांपोटी उत्पन्न सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत १,१९,९०१ कोटी रुपये असे वाढले आहे. वर्षापूर्वी याच तिमाहीत ते १,०७,३९७ कोटी रुपये होते. कंपनीचे इतर उत्पन्न मात्र मागील वर्षीच्या याच तिमाहीतील २४८ कोटी रुपयांवरून जवळपास निम्मे होऊन यंदा १४५ कोटी रुपयांवर सीमित राहिले आहे. तरी एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या याच कालावधीतील २,०१,५८७ कोटी रुपयांवरून वाढून, २,२९,६२० कोटी रुपये झाले आहे. तिमाहीत एकूण खर्चही वाढून २,२२,३६६ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत १,९४,३३५ कोटी रुपये होता. मुख्यत: कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनावर तिमाहीत ४६४ कोटी रुपयांचा खर्च कंपनीने केला.

हेही वाचा >>>जेट एअरवेज: उदय-अस्ताचा ३२ वर्षांचा प्रवास

एलआयसीचा ‘सॉल्व्हन्सी रेशो’ सप्टेंबरअखेर १९० टक्क्यांवरून, १९८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, सकल अनुत्पादित मालमत्ता (ग्रॉस एनपीए) प्रमाण मागील वार्षिक तुलनेत २.४३ टक्क्यांवरून १.७२ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. सप्टेंबरअखेर आर्थिक वर्षाच्या सहामाहीत, एलआयसीने ३.५ टक्क्यांच्या वाढीसह १८,०८२ कोटी रुपयांचा (मागील वर्षातील १७,४६९ कोटी रुपयांच्या तुलनेत) निव्वळ नफा कमावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजार हिस्सेदारीत वाढ

पहिल्या वर्षाच्या हप्त्यापोटी कमावलेल्या उत्पन्नानुसार, एलआयसीचा बाजार हिस्सा सप्टेंबरअखेर सहामाहीसाठी ६१.०७ टक्क्यांवर गेला आहे. आयुर्विमा व्यवसायात एलआयसी आघाडीवर कायम असून, बाजारहिस्सा मागील वर्षातील ५८.५० टक्क्यांच्या तुलनेत यंदा वाढला आहे.