पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी केंद्र सरकारला ९१८.३९ कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी निधू सक्सेना यांनी धनादेश सुपूर्द केला. यावेळी केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू व वित्तीय सेवा विभागाचे संयुक्त सचिव आशिष माधवराव मोरे उपस्थित होते.

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी महाबँकेकडून भागधारकांना प्रतिसमभाग १.५० रुपये लाभांश जाहीर करण्यात आला होता. सरलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेच्या नफ्यात ३६.१२ टक्के वाढ होऊन तो ५,५२० कोटी रुपयांवर पोहोचला. तर त्याआधीच्या वर्षात बँकेला ४,०५५ कोटींचा नफा मिळाला होता.  महाबँक सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करत असून एकूण व्यवसायात १५.३० तर ठेवी संकलनात १३.४४ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. बँकेच्या देशभरात २,६०० हून अधिक शाखा कार्यरत आहेत.

महा बँकेच्या सर्वोत्तम कामगिरीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम, प्रयत्न व समर्पित वृत्ती योग्य वेळी महत्वपूर्ण परिचालनात्मक निर्णय घेतल्यामुळे ते सर्वोत्तम कामगिरीत प्रतिबिंबित झाले आहेत. डिजिटल तंत्र आणि अधिक सुलभ ग्राहकस्नेही बँकिंग प्रणालीवर लक्ष केंद्रित केल्याने बँकेचा निव्वळ नफा तिमाही दर तिमाही वाढतो आहे. आजघडीला २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशात बँकेच्या२,६०० हून अधिक शाखा आणि २४०० हून एटीएम केंद्र कार्यरत आहेत.