पीटीआय, नवी दिल्ली
वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या महिंद्र अँड महिंद्र सुमारे २३,००० कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी समभाग मालकी योजना (ईसॉप) जाहीर केली आहे. यामध्ये कारखान्यामध्ये प्रत्यक्ष फ्लोअर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनिश शाह यांनी बुधवारी सांगितले.
या उपक्रमात महिंद्राच्या तीन प्रमुख उपकंपन्या – महिंद्र अँड महिंद्र (वाहन निर्मिती आणि फार्म सेक्टर), महिंद्र इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल आणि महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी यांचा समावेश आहे, असे शाह यांनी सांगितले. एका मोठ्या भारतीय समूहाने शॉप फ्लोअर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईएसओपीचा विचार करणे हे एक दुर्मिळ आणि उद्योग क्षेत्रातील पहिलेच उदाहरण आहे.
कंपनीतील प्रत्येक व्यक्तीसाठी ईसॉपअसून कंपनीच्या या कर्मचाऱ्यांना सन्मानित करणाऱ्या संस्कृतीबद्दल अभिमान आहे. हे कृतज्ञतेचे प्रतीक असून त्यांच्या प्रयत्नांमुळे अत्यंत चांगले काम करण्यास मदत झाली आहे. महिंद्र समूहाचे बाजार भांडवल एप्रिल २०२० पासून १२ पट वाढले आहे. याची जाणीव ठेवत समूहाने योजना आणली आहे, असे शाह यांनी सांगितले.
महिंद्र अँड महिंद्रने सरलेल्या जून तिमाहीत ४,०८३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत नफ्यात २४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून कालावधीत ३,२८३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. जून तिमाहीत एकूण उत्पन्न ४५,५२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत ३७,२१८ कोटी रुपये होते. बुधवारच्या सत्रात महिंद्र अँड महिंद्रचा समभाग ०.८७ टक्के वाढीसह ३,२४०.१० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ३.८७ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.
कर्मचारी पात्रता काय असेल?
समूहातील २३,००० कर्मचाऱ्यांसाठी एकूण वितरण ४००-५०० कोटी रुपयांच्या श्रेणीत असेल. किमान १२ महिने सेवा असलेले कायमस्वरूपी वेतनावर असलेले कर्मचारी ईसॉपचा लाभ मिळविण्यास पात्र असतील. या योजनेचा उद्देश दीर्घकालीन समूहामध्ये चांगले योगदान देणाऱ्यांना बक्षीस देणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना कंपनीच्या संपत्ती निर्मितीशी संरेखित करण्याचे आहे.
‘ईसॉप’ म्हणजे काय?
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी कर्मचारी समभाग मालकी योजना (ईसॉप) अस्तित्वात आली. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना समभागाच्या माध्यमातून कंपनीची मालकी दिली जाते. या योजनेत कंपनी, समभाग हे मोफत किंवा अल्पदराने वितरित करते.