लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी  मुंबईः जपानमधील सुमिमोटो कॉर्पोरेशनचा एसएमएल इसुझू कंपनीतील संपूर्ण हिस्सा ताब्यात घेण्यासाठी महिंद्र अँड महिंद्र समूहाने चर्चा सुरू केली आहे. सुमिमोटो ही एसएमएल इसुझू या वाहननिर्मिती कंपनीची पालक कंपनी आहे.

महिंद्र अँड महिंद्रला मालमोटारी आणि बस निर्मिती व्यवसायाचा विस्तार करण्यास या व्यवहारामुळे मदत होणार आहे. एसएमएल इसुझूचे प्रति समभाग १,४०० ते १,५०० रुपये भावाने खरेदी केले जाण्याची शक्यता आहे. भांडवली बाजारात या कंपनीच्या समभागाने सोमवारी पावणे पाच टक्के वाढीसह १,७२५ रुपयांची पातळी गाठली. त्यावेळी कंपनीचे बाजार भांडवल २ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचले.

कंपनीच्या समभागाची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी २,४०५ रुपये आणि नीचांकी पातळी १,०२८ रुपये आहे. महिंद्र अँड महिंद्रच्या संचालक मंडळाची या आठवड्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. सध्या सुमिमोटो कॉर्पोरेशनचा एसएमएल इसुझू कंपनीमध्ये ४३.९६ टक्के हिस्सा आहे. जपानमधील इसुझू कंपनीचाही त्यात १५ टक्के हिस्सा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिंद्र अँड महिंद्रच्या गुंतवणूकदारांमध्ये मात्र या घडामोडीने उत्साह निर्माण केल्याचे दिसूले नाही. सोमवारी बाजारात तेजीचे तुफान असतानाही कंपनीच्या समभागांत एक टक्क्यांच्या घसरण दिसून आली आणि तो २,७७६ रुपयांवर दिवसअखेरीस स्थिरावला.