मुंबई : माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील विक्रीच्या दबावामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. कंपन्यांकडून तिमाही आर्थिक कामगिरी जाहीर केली जात असल्याने त्याआधी गुंतवणूकदारांनी नफावसुलीचे धोरण अवलंबले आहे. शिवाय भारत -अमेरिका व्यापार कराराबाबत अद्याप अनिश्चितता कायम असल्याने गुरुवारच्या सत्रात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त कर आकारणीबाबत आगामी घोषणा आणि देशांतर्गत आघाडीवर कंपन्यांच्या तिमाही उत्पन्नाच्या हंगामाची सुरुवात या दोन महत्त्वाच्या घटनांपूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३४५.८० अंशांची घसरण झाली आणि तो ८३,१९०.२८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४०१.११ अंश गमावत ८३,१३४.९७ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२०.८५ अंशांची घसरण होऊन तो २५,३५५.२५ पातळीवर बंद झाला. जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मक कलामुळे देशांतर्गत बाजारातील घसरण मर्यादित राहिली.

टीसीएसच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांपूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांचे समभाग घसरले. माहिती तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या कमाईच्या हंगामाची सुरुवात निराशाजनक राहण्याच्या शक्यतेमुळे पहिल्या तिमाहीच्या निकालांपूर्वी गुंतवणूकदारांची सावध पवित्रा घेतला आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, एशियन पेंट्स, इन्फोसिस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टेक महिंद्रच्या समभागात घसरण झाली, तर मारुती, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या समभागांची कामगिरी चमकदार राहिली.

सेन्सेक्स ८३,१९०.२८ – ३४५.८० (-०.४१%)

निफ्टी २५,३५५.२५ – १२०.८५ (-०.४७%)

तेल ७० -०.२७ %

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉलर ८५.६९ -४ पैसे