लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सामाजिक, वैचारिक आणि आर्थिक आघाडीवर सर्वांपुढे असणाऱ्या मराठी माणसाने म्युच्युअल फंडासारख्या सूज्ञ गुंतवणुकीतही आघाडी राखली आहे. महाराष्ट्र राज्याने अग्रस्थान कायम राखताना सरलेल्या जून महिन्यातील देशातील म्युच्युअल फंडाच्या सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्तेत एकट्या राज्याचा ४०.६१ टक्के वाटा आहे.
‘इक्रा ॲनालिटिक्स’च्या अहवालानुसार, जूनमध्ये देशांतर्गत म्युच्युअल फंड उद्योगाच्या सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एएयूएम) नवी दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यांचे प्रत्येकी योगदान १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर देशातील पहिल्या पाच राज्यांनी जूनमध्ये देशांतर्गत म्युच्युअल फंड उद्योगाच्या मालमत्तेत ६७.६५ टक्के वाटा राखला आहे.
मुंबई महानगरी ही देशाची आर्थिक राजधानीच आहे, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या देशाच्या एकूण मालमत्तेत एकट्या मुंबईचा वाटा ३३.४४ टक्क्यांचा असणेही तसे नवलाचे नाही. पण मुंबईसह महाराष्ट्राचा वाटा तब्बल सात टक्क्यांहून अधिक भर घालणारा म्हणजे ४०.६ टक्क्यांवर जाणारा आहे. ‘ॲम्फी’ या म्युच्युअल फंड उद्योगाच्या संघटनेकडून उपलब्ध माहितीनुसार, राज्यात सांगलीमधून वार्षिक ४३.८ टक्के अशा सर्वाधिक दराने म्युच्युअल फंडात मार्च २०२५ पर्यंत ४,५७६ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत, अमरावतीतील वार्षिक वाढीचा दर ४१.८ टक्के आणि एकूण गुंतवणूक ४,५३० कोटी रुपये, मुंबईनजीक मीरा रोडमधून वार्षिक ३७.७ टक्के वाढीसह ५,८७७ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत.
वाढीच्या दृष्टिकोनातून, नागालँडमध्ये सरलेल्या महिन्यांत एएयूएममध्ये सर्वात वेगवान ६२.४७ टक्के वाढ नोंदवली गेली. त्यानंतर लक्षद्वीप आणि लद्दाख या प्रदेशांतून गुंतवणुकीत अनुक्रमे १९.१८ टक्के आणि १८.१७ टक्के वाढ दिसून आली. वार्षिक आधारावर, नागालँडमधून गुंतवणुकीत सर्वाधिक १००.५७ टक्के वाढ झाली, त्यानंतर दादरा आणि नगर हवेलीचा क्रमांक लागतो, ज्यांच्या गुंतवणुकीत ५६.५२ टक्के वाढ झाली आहे.
समभागसंलग्न अर्थात इक्विटी-केंद्रित योजनांचे एकूण वाढ झालेल्या मालमत्तेत योगदान ५४.७६ टक्के इतके राहिले, त्यानंतर रोखेसंलग्न (डेट) योजना आणि लिक्विड योजनांचा वाटा अनुक्रमे १४.८८ टक्के आणि १२.५० टक्के असा जूनमध्ये होता. इक्विटी-केंद्रित योजनांचे योगदान लद्दाखमध्ये सर्वाधिक ९०.८५ टक्के होते, त्यानंतर लक्षद्वीपचा क्रमांक लागतो, ज्यामध्ये इक्विटी-केंद्रित योजनांचे योगदान ८४.०७ टक्के होते. अर्थात या प्रदेशांमधून गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणांत समभागांवर केंद्रीत राहिली आहे.
वित्तीय शहाणपण, समंजस गुंतवणूक निर्णय हा मक्ता केवळ शहरांचा राहिलेला नाही, याचा परिचय म्युच्युअल फंडातील सातत्यपूर्ण आणि वाढता ओघही करून देतो. सर्वार्थाने स्वागतार्ह ठरावी अशी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडासारख्या आजवर शहरांपुरत्या सीमित राहिलेल्या संपत्ती निर्माणाच्या साधनाशी गावांचे पक्के नाते जुळू लागले आहे. गावांत पैसा आहे, पण पैशाने पैसा वाढवत नेता यायला हवा. म्हणजेच पैशाला कामाला जुंपून धननिर्माण करता येते, याची महती गावालाही पटू लागल्याचे अधिकृत आकडेवारीच सांगते.