नवी दिल्लीः वॅगन आर, अल्टो के१०, सेलेरिया आणि इको या मोटारींमध्ये आता सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सहा एअरबॅग देण्याची घोषणा मारूती सुझुकी इंडियाने सोमवारी केली. हॅचबॅक, कॉम्पॅक्ट कारसारखी छोट्या मोटारी सामान्यतः मोठ्या मोटारींपेक्षा सुरक्षित मानली जातात. कारण त्यांचे वजन कमी असल्याने, अपघात झाल्यास त्यांना कमी नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु रस्तावरील इतर मोठ्या वाहनांशी तुलना केल्यास, या छोट्या मोटारींमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये पुरेशी नसतात. ही उणीव भरून काढण्यासाठी मारुती सुझुकीने पाऊल टाकले आहे.
ग्राहकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. याबाबत कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी म्हणाले की, देशात रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत आहे. त्यात द्रुतगती महामार्गांचा समावेश आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये आणखी वाढ करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यातून कंपनीने वॅगन आर, अल्टो के१०, सेलेरियो आणि इको या मोटारींमध्ये सहा एअरबॅग देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून ग्राहकांचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत होईल.
छोटेखानी श्रेणीतील मारूती सुझुकीच्या या मोटारींची लोकप्रियता खूप आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. चालकासह एकूणच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.