नवी दिल्ली : संगणक कार्यप्रणाली विंडोजच्या निर्मात्या मायक्रोसॉफ्टकडून आगामी जुलैमध्ये हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे नियोजन सुरू असल्याचे वृत्त आहे. यामुळे या वर्षातील कंपनीची ही तिसरी मोठी मनुष्यबळ कपात ठरण्याची शक्यता आहे.

मायक्रोसॉफ्टचे नवीन आर्थिक वर्ष हे १ जुलैपासून सुरू होते आणि त्याची सुरुवात कर्मचारी कपातीने होणे अपेक्षित आहे. एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञेमधील वाढती गुंतवणूक आणि खर्च याचा योग्य ताळमेळ राखण्यासाठी कंपनीकडून हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. कंपनीने या वर्षात सुरूवातीला संगणक अभियंते आणि उत्पादन विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली होती. आता विक्री आणि विपणन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक कपात होण्याची शक्यता आहे.

कंपनीमध्ये विक्रीशी निगडित काम करणारे तब्बल ४५ हजार कर्मचारी आहेत. त्यांना या कपातीचा मोठा फटका बसणार आहे. मायक्रोसॉफ्टने संगणकीय प्रणालीच्या विक्रीची जबाबदारी बाह्य संस्थांकडे देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता विक्री विभागातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायक्रोसॉफ्टकडून महत्त्वाकांक्षी कृत्रिम प्रज्ञा कार्यक्रमासाठी विदा केंद्रांच्या उभारणी केली जाणार असून, त्यासाठी ८० अब्ज डॉलरची तरतूद केली गेली आहे. यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनावर इतर विभागातील खर्च कमी करण्याचा दबाव आहे. कंपनीचे मुख्याधिकारी सत्या नाडेला यांनी कर्मचारी कपात ही कामगिरीच्या आधारे होणार नसून, कंपनीच्या धोरणाची गरज म्हणून सुरू असल्याचे या आधीच म्हटले आहे.

कर्मचारी कपातीचे चक्र

मायक्रोसॉफ्टने याआधी मे महिन्यात ६,००० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. त्यानंतर लगेचच आणखी ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. ॲक्टिव्हिजन ब्लिझार्ड ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्टने गेमिंग विभागातील कर्मचाऱ्यांची कपातही केली होती.