गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात खनिज उत्पादनात ६.४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती खाण मंत्रालयाने आज दिली आहे. इंडियन ब्युरो ऑफ माइन्सकडून जारी करण्यात आलेल्या अंतरिम डेटामध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे. एप्रिल आणि मे २०२२-२३ मध्ये खनिजांची एकूण वाढ मागील वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत ५.८ टक्क्यांनी जास्त होती. यंदा मे महिन्यात ज्या महत्त्वाच्या खनिजांचे उत्पादन लक्षणीय होते, त्यात कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, मॅग्निज धातू, मॅग्नेसाइट, तांबे, क्रोमाईट, लोह धातू, चुना, शिसे, बॉक्साईट आणि जस्त यांचा समावेश आहे.
मे २०२३ महिन्यासाठी (आधार २०११-१२=१००) खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक १२८.१ वर पोहोचला, जो इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (IBM) च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार मे २०२२ मधील पातळीच्या तुलनेत ६.४ टक्के जास्त आहे. तसेच एप्रिल -मे २०२२-२३ या कालावधीसाठी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकत्रित वाढ ५.८ टक्के इतकी आहे.
मे २०२३ मध्ये महत्त्वाच्या खनिजांची उत्पादन पातळी
कोळसा ७६२ लाख टन, लिग्नाइट ३५ लाख टन, पेट्रोलियम (क्रूड) २५ लाख टन, लोह खनिज २५३ लाख टन, चुनखडी ३८७ लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेला) २८३८ दशलक्ष घन मीटर, बॉक्साइट २३८६ हजार टन, क्रोमाईट ३७२ हजार टन, तांबे ९ हजार टन, शिसे (लिड कॉन्सन्ट्रेट) ३३ हजार टन, मॅग्निज खनिज ३२९ हजार टन, झिंक १३३ हजार टन, फॉस्फोराईट १४० हजार टन, मॅग्नेसाइट ११ हजार टन आणि सोने ९७ किलो.
हेही वाचाः पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहितीय? एलॉन मस्क त्याच्यासमोर काहीच नाही!
मे २०२२ च्या तुलनेत मे २०२३ मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमध्ये मॅग्निज धातू (४०.४%), मॅग्नेसाइट (२८.२%), तांबे (२४.४%), क्रोमाइट (१६.३%),लोह धातू (१३.६%), चुनखडी (१०.१%), शिसे (९.७%), कोळसा (७%), बॉक्साईट (४.८%) आणि झिंक कॉन्क (२.९%) यांचा समावेश आहे.
नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांमध्ये नैसर्गिक वायू (यू)(०.३%), पेट्रोलियम (क्रूड) (-१.९%), फॉस्फोराईट (-६.३%) आणि लिग्नाइट (-१७.७%) यांचा समावेश आहे.