पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा विकासदर २०२३ मध्ये ६.७ टक्के राहील, असा अंदाज मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने शुक्रवारी वर्तविला. याआधी मूडीजने चालू वर्षासाठी ५.५ टक्के विकासदराचा अंदाज वर्तविला होता. आता त्यात टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे.

भारतातील सेवा क्षेत्राचा विस्तार आणि भांडवली खर्चात झालेली वाढ यामुळे एप्रिल ते जून तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात ‘जीडीपी’तील वाढ ७.८ टक्क्यांवर पोहोचली. तिमाही वाढीचा हा दर पाहता पूर्वी व्यक्त अंदाजात सुधारणा करीत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. चालू वर्षासाठी ५.५ टक्के विकासदराचा अंदाज होता, त्यात वाढ करून तो आता ६.७ टक्क्यांवर नेण्यात येत आहे.

आणखी वाचा-सेन्सेक्सची ५५६ अंशांची मुसंडी, सप्ताहाची सांगता तेजीने

भारताच्या अर्थचक्राला गती मिळाली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सरलेल्या तिमाहीत विकासदर जास्त नोंदविण्यात आल्यामुळे एकूण वर्षभरातील विकासदरात चांगली वाढ होण्याची चिन्हे आहेत. याच वेळी पुढील वर्षासाठी विकासदराचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून कमी करून ६.१ टक्क्यांवर आणण्यात आला आहे, असे मूडीजने स्पष्ट केले आहे.

महागाईचा धोका कायम

भारतात मोसमी पाऊस जून ते ऑक्टोबर या कालावधीत पडतो. तो सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यवस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने देशभरात पावसात ९ टक्के तूट असल्याचे म्हटले आहे. एल निनोचा प्रभाव या वर्षाच्या उत्तरार्धात जास्त राहिल्यास शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतील आणि महागाईचा धोकाही वाढेल, असा इशारा मूडीजने दिला आहे.

आणखी वाचा-कच्च्या तेलावर विंडफॉल कर कपात, जाणून घ्या त्याचा काय परिणाम होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग तिसऱ्या पतधोरणात ऑगस्टमध्ये व्याजदर स्थिर ठेवले. खाद्यवस्तूंची वाढती महागाई आणि एल निनोमुळे पावसाची वाढलेली अनिश्चितता पाहता पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत व्याजदर कमी होण्याची शक्यता धूसर आहे. -मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे टिपण