प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू झाल्यापासून अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत योजनेसाठी १.४० लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली. पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशाबद्दल माहिती देताना राणे यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या समाज माध्यमावरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारली आहे आणि योजना सुरू झाल्यापासून दहा दिवसांच्या आत एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होणे हा या योजनेचे यश आणि सर्वोच्च महत्त्व याचा दाखला आहे”.
हेही वाचाः जुलै २०२३ मध्ये खनिज उत्पादनात १०.७ टक्के वाढ




प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही आपल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विश्वकर्मा बंधू आणि भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल आणि ही योजना त्यांचा हरवलेला सन्मान आणि दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेली ओळख पुनर्संचयित करेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. या योजनेद्वारे विश्वकर्मा बंधू-भगिनींना प्रशिक्षण, टूल किट आणि तारणमुक्त कर्ज दिले जाईल. प्राप्त अर्जांची यशस्वी पडताळणी केल्यानंतर आपल्या विश्वकर्मा बंधू आणि भगिनींना योजनेचे सर्व लाभ दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार यांची उत्पादन क्षमता वाढवणे तसेच त्यांची उत्पादने देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत नेणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे केंद्रीय मंत्री राणे यांनी सांगितले. या योजनेंतर्गत १८ प्रकारच्या कारागिरांना आणि शिल्पकारांना लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रशिक्षणादरम्यान त्यांना दररोज ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. याशिवाय टूल किट खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. लाभार्थी ३ लाखांपर्यंतच्या तारणमुक्त कर्जासाठी देखील पात्र असतील, असे त्यांनी सांगितले.