मुंबई: देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनांत ३० टक्के, तर निर्यातीत ५० टक्के योगदान असणाऱ्या आणि तब्बल ११ कोटींहून अधिकांना नियमित रोजगार मिळवून देणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना नव-तंत्रज्ञान आणि वित्त पुरवठ्याचे स्रोत खुले करून देणारा राष्ट्रीय स्वरूपाचा कार्यक्रम येत्या बुधवारी मुंबईत योजण्यात आला आहे.
देशभरातून तब्बल १,००० हून अधिक उद्योजकांना एका छत्राखाली आणणारा हा ‘एमएसएमई महोत्सव’, १७ सप्टेंबरला नेस्को, गोरेगाव पूर्व येथे होत आहे. नामांकित वित्तीय संस्था, नवप्रवर्तक, धोरणकर्ते आणि शैक्षणिक संस्थांच्या सहभागासह या अद्वितीय परिषद आणि प्रदर्शनाची योजना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होत असलेल्या या कार्यक्रमात, एमएसएमई उद्योगांना निधी आणि तंत्रज्ञानाच्या सुलभ उपलब्धतेवर भर देताना, त्यांच्या वाढीसाठी दिशा निश्चित केली जाईल.
सर्वार्थाने आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले हे क्षेत्र, कुशल आणि अकुशल कामगारांच्या सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे. एमएसएमई क्षेत्राला आर्थिक वाढ करण्याशी विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने चर्चासत्रे, परिसंवाद, आदान-प्रदान, नेटवर्किंग आणि सहयोग घडून येण्यासाठी ‘बी २ बी’ बैठका आणि हाय-टेक प्रदर्शन योजण्यात आले आहे.
असे या संयोजनाचे उद्दिष्ट हे आव्हानांचा सामना करणे आणि येत्या काही वर्षांत या क्षेत्राच्या गुणांक पद्धतीने वाढीचा मार्ग मोकळा केला जावा, हे या महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचे संयोजक अरविंद सिंग म्हणाले. या निमित्ताने घडणाऱ्या चर्चेत, व्यवसाय सुलभता, डिजिटल परिवर्तन, ई-कॉमर्स, फिनटेक, ब्रँडिंग आणि बाजारपेठ (मार्केट रीच) आणि एमएसएमईसाठी सरकारी योजना आणि धोरणे यासारख्या विषयांचाही उहापोह होणे अपेक्षित आहे, असे सिंग पुढे म्हणाले.
एआय तंत्रज्ञानाच्या अवलंबाला प्रोत्साहन
एमएसएमई कशाप्रकारे डिजिटल होत आहेत आणि जनरेटिव्ह एआय या सारख्या उपयोजित नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवोन्मेषाला चालना देत आहेत याचा हे महोत्सव म्हणजे प्रात्यक्षिक असेल. ‘पॉवरिंग एमएसएमई थ्रू टेक्नॉलॉजी फॉर ग्रोथ’ (वाढीसाठी तंत्रज्ञानाद्वारे एमएसएमईला बळकटी) ही या संकल्पनेवर केंद्रित हे आयोजन आहे.
हा कार्यक्रम ज्ञानाची देवाणघेवाण, दळणवळण आणि सहकार्य, व्यावसायिक सौदे, नवकल्पनांना वाट मोकळी करून देत, व्यवसायाच्या नवीन संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. या एक दिवसीय कार्यक्रमात, आघाडीचे तंत्रज्ञान पुरवठादार, बँका आणि एनबीएफसी, विमा कंपन्या, सरकारी संस्था, पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक कंपन्या, मनुष्य संसाधन विकास आणि प्रशिक्षण क्षेत्रातील कंपन्या या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी बजावत असलेल्या त्यांच्या भूमिकांना अधोरेखित करतील. परिषद व प्रदर्शनासंबंधी https://msmemahotsav.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध तपशील पाहता येईल.