नवी दिल्ली : जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने (जिओफिन) जर्मनीच्या अलियान्झसोबत भारतात पुनर्विमा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ‘अलियान्झ जिओ रि-इन्शुरन्स लिमिटेड’ (एजेआरएल) नावाची संयुक्त कंपनी स्थापित केल्याची मंगळवारी घोषणा केली.
दोन्ही कंपन्यांनी वाढीच्या उच्च शक्यता असलेल्या विमा बाजारपेठेला सेवा देण्यासाठी ५०:५० अशा समान भागीदारीने देशांतर्गत पुनर्विमा क्षेत्रात संयुक्त उपक्रम कराराची घोषणा यापूर्वीच केली होती. बजाज समूहातील वित्तीय सेवा कंपनी बजाज फिनसर्व्हपासून फारकत घेतल्यानंतर, अलियान्झने काही महिन्यांनी ही घोषणा करण्यात आली.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात ‘इर्डा’कडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एजेआरएलची स्थापना करण्यात आली आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून ८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘जेएफएसएल’ला निगमन प्रमाणपत्र प्राप्त झाले. जिओफिन नव्याने उदयास येणाऱ्या ‘एजेआरएल’ या संयुक्त कंपनीमध्ये ५० टक्के भागभांडवलासाठी प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे २५,००० भागभांडवली समभागासाठी २.५० लाख रुपये गुंतविणार आहे.
या संयुक्त उपक्रमामुळे अलियान्झच्या विद्यमान अलियान्झ री आणि अलियान्झ कमर्शियल पोर्टफोलिओ आणि भारतातील कंपनीला फायदा होईल. अलियान्झ री गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ भारतात जोखीम पुनर्विमा व्यवसाय करत आहे.