लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: कंपन्यांची जून तिमाहीतील निराशाजनक आर्थिक कामगिरी, परदेशी निधीचे निर्गमन आणि बँकांच्या समभागांमधील विक्रीच्या माऱ्यामुळे शुक्रवारी सप्ताहअखेर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ५०१ अंशांनी घसरला. दुसरीकडे निफ्टी देखील २५,००० अंशांच्या पातळीखाली बंद झाला.
सलग दुसऱ्या सत्रात घसरण होत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५०१.५१ अंशांनी घसरून ८१,७५७.७३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६५१.११ अंशांनी घसरून ८१,६०८.१३ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४३.०५ अंशांची घसरण झाली आणि तो २४,९६८.४० या महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
वित्त आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या निराशाजनक आर्थिक कामगिरीने बाजारात व्यापक विक्री दिसून आली. लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागांचे वाढलेले मूल्यांकन आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निव्वळ शॉर्ट अर्थात विक्रीच्या धोरणामुळे एकंदर बाजारात सावधगिरीची भावना निर्माण झाली आहे.
शिवाय रशियासोबतच्या व्यापार संबंध कायम ठेवल्यास अमेरिकेकडून अतिरिक्त कर लादण्याचा धोका आहे. मात्र या दबावांना न जुमानता, भारतासाठी मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीकोन आशावादी आहे. नियंत्रित महागाई दर आणि आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या सहकार्याची भूमिका घेतल्याने अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
विश्लेषकांच्या मते, ॲक्सिस बँकेच्या ताज्या आर्थिक निकालांमुळे गुंतवणूकदारांनी बँकिंग समभागाबद्दल सावधगिरी बाळगली. बँकेचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले आहेत. ॲक्सिस बँकेच्या जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३ टक्क्यांनी घट होऊन तो ६,२४३.७२ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. परिणामी बँकेच्या समभागांत ५.२४ टक्क्यांनी घसरण झाली. ब्लू-चिप बँक समभागांत, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक आणि स्टेट बँकेचे समभाग घसरले. बँकांच्या समभागांत घसरण झाल्यानंतर, बीएसई बँकेक्स निर्देशांक १.३३ टक्क्यांनी घसरून ६२,७४१.६५ पातळीवर बंद झाला. मात्र, बजाज फायनान्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि इन्फोसिस यांची कामगिरी समाधानकारक राहिली.
मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ३,६९४.३१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींची झळ
सलग दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ४६१ लाख कोटींवरून ४५८ लाख कोटींपेक्षा खाली घसरले आहे. म्हणजेच गुंतवणूकदार शुक्रवारी एकाच सत्रात सुमारे ३ लाख कोटी रुपयांनी गरीब झाले.
सेन्सेक्स ८१,७५७.७३ -५०१.५१
निफ्टी २४,९६८.४० -१४३.०५
तेल ७०.१६ ०.९२%
डॉलर ८६.१६ ४ पैसे