पीटीआय, नवी दिल्ली

Nirmala Sitharaman : वस्तू व सेवा करातील (जीएसटी) सुधारणा आणि कराच्या टप्प्यातील बदल यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली तीन स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. त्यात नवीन कर टप्प्यांसाठी जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) या संगणकीय प्रणालीतील बदल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

याविषयी सीतारामन म्हणाल्या की, सरकारने जीएसटीएन अद्ययावत करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आमच्याकडून जीएसटीतील सुधारणा आणि बदलांसाठी सज्जता केली जात आहे. जीएसटी परिषदेकडे या सुधारणा आणि बदलांना मंजुरी मिळते की नाही, हे मला माहिती नाही. मात्र, परिषदेने याला मंजुरी दिल्यानंतर आमची पायाभूत सुविधा याची अंमलबजावणीसाठी सक्षम आहे का आणि तयारी करण्यासाठी किती वेळ लागेल, हे दोन प्रश्न उपस्थित होतील. त्यामुळे आम्ही पूर्वतयारी करण्यावर भर दिला आहे.

जीएसटी परतावा भरणे आणि कर देयके यासाठी माहिती तंत्रज्ञानाचे पाठबळ जीएसटीएन या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून मिळते. कराच्या टप्प्यांत बदल झाल्यानंतर ही प्रणाली अद्ययावत करावी लागणार आहे. याचबरोबर व्यवसासायांनाही त्यांची प्रणाली २२ सप्टेंबरपासून अद्ययावत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीतारामन म्हणाल्या की, जीएसटीएन अथवा डिजिटल नेटवर्कमध्ये हे बदल प्रत्यक्षात होण्यासाठी किती वेळ लागेल, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. ही यंत्रणा २२ सप्टेंबरला बदल लागू करण्यास तयार असेल, असे मला सांगण्यात आले आहे.

जीएसटीतील बदलांमुळे सरकारला ४८ हजार कोटी रुपयांची महसूली तूट येणार आहे. मात्र, क्रयशक्तीमध्ये होणाऱ्या वाढीमुळे ही तूट भरून निघेल. अनेक वस्तूंवरील करामध्ये कपात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार असून, विकास दरालाही हातभार लागणार आहे.- निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री