मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने जुलैमध्ये २३ कोटी गुंतवणूकदार ट्रेडिंग खात्यांचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामध्ये तीन महिन्यांत १ कोटींची भर पडली आहे, अशी माहिती बुधवारी एनएसईने दिली. विद्यमान वर्षात एप्रिल २०२५ मध्ये एनएसईने २२ कोटी ट्रेडिंग खात्यांचा टप्पा ओलांडला होता. दरम्यान, जुलै २०२५ पर्यंत अद्वितीय नोंदणीकृत (यूनिक रजिस्टर इन्व्हेस्टर) गुंतवणूकदारांची संख्या ११.८ कोटी होती. एकच गुंतवणूकदार अनेक ब्रोकरकडे खाती ठेवू शकतो आणि त्यामुळे त्याचे अनेक ग्राहक क्रमांक (क्लायंट कोड) असू शकतात.
महाराष्ट्र आघाडीवर महाराष्ट्र गुंतवणूकदार ४ कोटीं खात्यांसह आघाडीवर असून यात १७ टक्के बाजारहिस्सा राखून आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश (२.५ कोटी, ११ टक्के हिस्सा), गुजरात (२ कोटींहून अधिक, ९ टक्के हिस्सा) आणि पश्चिम बंगाल आणि राजस्थान (प्रत्येकी १.३ कोटींहून अधिक, ६ टक्के हिस्सा ) यांचा क्रमांक लागतो.
एकत्रितपणे, या पाच राज्यांमध्ये एकूण गुंतवणूकदार खात्यांपैकी जवळजवळ निम्मे गुंतवणूकदार खाती आहेत, तर आघाडीच्या दहा राज्यांमध्ये एकूण गुंतवणूकदारांच्या तीन-चतुर्थांश वाटा आहे. बाजारातील सहभागींचा वाढता वाटा तरुण आणि पहिल्यांदाच गुंतवणूकदारांचा आहे.
जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता असूनही भारतातील भांडवली बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास अढळ असून त्यात आणखी वाढ होत आहे, असे एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले. जलद डिजिटलायझेशन आणि मोबाइल-आधारित ट्रेडिंग ऍपच्या व्यापक वापरामुळे हा विस्तार झाला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी, विशेषतः ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. हे व्यापक बाजार समावेशनाला चालना देण्यासाठी लक्ष्यित धोरण आणि संस्थात्मक प्रयत्नांची प्रभावीता देखील अधोरेखित करते असेही ते म्हणाले.