पीटीआय, नवी दिल्ली

देशातील आघाडीचा बाजार मंच असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईची बहुप्रतिक्षित प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून अखेर त्याला मान्यता मिळण्याची आशा आहे.
सध्या सेबी आणि एनएसई दोघेही प्रलंबित मुद्दे सोडवण्यासाठी आणि बाजारमंचाचा भांडवली बाजारातील पदार्पणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. आयपीओसाठी उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे, असे सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी गुरुवारी सांगितले. आयपीओसंबंधित सर्व प्रलंबित मुद्दे सोडवले जातील. तूर्तास कोणतीही वेळ निश्चित केलेली नसली लवकरच एनएसईचा आयपीओ येईल, असेही पांडे म्हणाले.

एनएसईच्या आयपीओ योजना गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ रखडली आहे. अलिकडेच एनएसईने सेबीकडे पुन्हा एकदा ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करून त्यांची भांडवली बाजारात सूचिबद्धतेची प्रक्रिया पुन्हा पटलावर आणली आहे. वर्ष २०१६ मध्ये, विद्यमान शेअरधारकांनी आंशिक समभाग विक्रीच्या अर्थात ओएफएसच्या माध्यमातून २२ टक्के समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. त्या माध्यमातून सुमारे १०,००० कोटी रुपयांची निधी उभारला जाणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनातील समस्या आणि सह-स्थान घोटाळा प्रकरणाशी संबंधित नियामक चिंतेमुळे ‘सेबी’ने आयपीओसाठी मंजुरी नाकारली. तेव्हापासून, आयपीओला मंजुरीसाठी सेबीकडे अनेक वेळा संपर्क साधला गेला आहे. मार्चमध्ये, सेबीने एनएसईच्या आयपीओची तपासणी करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करण्याची घोषणा केली आणि बाजार नियामकाने एनएसईला यापूर्वी उपस्थित केल्या गेलेल्या सर्व समस्या सोडविण्यास सूचित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनएसईचे मूल्यांकन सुमारे ४.७ लाख कोटी रुपये आहे. २०२४ च्या बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० च्या सूचिबद्ध आणि सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांच्या यादीनुसार, देशातील ही १० व्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान खासगी कंपनी आहे. स्पर्धक मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईचा समभाग २०१७ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाला. भांडवली बाजारात समभाग सूचिबद्ध करणारे ते भारतातील पहिला बाजारमंच बनले.