मुंबई : वाहन निर्माता क्षेत्रातील आघाडीच्या टाटा मोटर्सने सरलेल्या जून तिमाहीत ३,२०३ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची कामगिरी केली आहे. प्रवासी वाहन विक्रीतील सुधारित नफाक्षमता आणि ब्रिटिश उपकंपनी जग्वार लँड रोव्हरने (जेएलआर) जूनअखेर संपलेल्या तिमाहीत केलेल्या १ लाखांहून अधिक मोटारींच्या विक्रीच्या परिणामी ही कामगिरी कंपनीला शक्य बनली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने ५,००६.६० कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे.

जेएलआर मोटारींच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत २९ टक्के वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर चिप आणि इतर सुट्या भागांचा पुरवठा सुरळीत झाल्याने कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या १ लाख १ हजार ९९४ मोटारींची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यात २९ टक्के वाढ झाली आहे.

सरलेल्या जून तिमाहीत कंपनीचा महसूल ४२ टक्क्यांनी वधारून १.०२ लाख कोटींवर पोहोचला आहे. तर तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई १७७ टक्क्यांनी वाढून १४,७०० कोटी रुपये नोंदवली गेली आहे. कंपनीच्या तिमाहीतील दमदार कामगिरीमुळे रोख प्रवाहात सुधारणा झाली अजून कंपनीवरील कर्जाचा भार ४१,७०० रुपयांपर्यंत खाली आला आहे, अशी माहिती कंपनीने दिली.

 ‘डीव्हीआर’चे सामान्य समभागांत रूपांतरणाचा प्रस्ताव

भांडवली रचना सुलभ करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने मंगळवारी कंपनीचे ‘ए’ सामान्य समभाग (टाटा मोटर्स डीव्हीआर) रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. कंपनीच्या हा निर्णय गुंतवणूकदारांना मात्र २३ टक्के अधिमूल्य मिळवून देणारा ठरणार आहे. आता १० टाटा मोटर्स डीव्हीआर समभागांच्या बदल्यात त्यांना टाटा मोटर्सचे ७ समभाग मिळणार आहे. मंगळवारच्या सत्रात टाटा मोटर्सचा समभाग १.६२ टक्क्यांनी वधारून ६३९.४५ रुपयांवर बंद झाला. तर टाटा मोटर्स डीव्हीआर समभाग ४.६१ टक्क्यांनी वधारून ३७४.४० रुपयांवर बंद झाला.

टाटा मोटर्सने सुरुवातीला २००८ मध्ये ‘ए’ सामान्य समभाग जारी केले होते. या ‘ए’ सामान्य समभाग हे कंपनीच्या सामान्य समभागांच्या तुलनेत पाच शतांश टक्के अधिक लाभ मिळविण्यास पात्र ठरत असले, तरी या समभागधारकांना हा सामान्य समभागांच्या धारकांच्या तुलनेत मतदानाचा १/१० वा अधिकार प्रदान केला गेला होता. सध्या, हे समभाग कंपनीच्या सामान्य समभागांच्या तुलनेत ४३ टक्के सवलतीने व्यवहार करत आहेत. सामान्य समभागांत रूपांतरण केव्हा होईल आणि त्यासाठी पात्रता (रेकॉर्ड) तारीख व अन्य तपशील कंपनीने अद्याप जाहीर केलेला नाही.