पीटीआय, नवी दिल्ली
देशभरात महिलांकडून १.८४ कोटींहून अधिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) गाडा यशस्वीपणे हाकला जात आहे. उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढण्यासाठी केंद्राने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांचे हे फलित आहे, असा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री जीतन राम मांझी यांनी गुरुवारी लोकसभेत केला.
केंद्र सरकारने ‘उद्यम’ आणि ‘उद्यम असिस्ट’ हे मंच स्थापन केल्यापासून त्यावर महिला उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. १ जुलै २०२० रोजी उद्यम मंच सुरू करण्यात आला त्यांनतर ११ जानेवारी २०२३ मध्ये उद्यम असिस्ट मंचाची स्थापना करण्यात आली आहे. देशात २३ जुलै २०२४ अखेरपर्यंत महिलांच्या मालकीच्या ‘एमएसएमईं’ची संख्या १,८४,५९,८०९ वर पोहोचली आहे.
हेही वाचा >>>Budget 2024 : आरोग्य व्यवस्थेच्या इलाजासाठी औषध अपुरे
उद्यमशील महिलांना प्रोत्साहन म्हणून, २०१८ मध्ये सार्वजनिक खरेदी धोरणात सुधारणा करत केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना त्यांच्या वार्षिक खरेदीच्या किमान तीन टक्के खरेदी महिलांच्या नेतृत्वाखालील ‘एमएसएमईं’मधून करण्यास सांगण्यात आले. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मालकीच्या ‘एमएसएमईं’साठी कर्जावर ८५ टक्क्यांपर्यंत हमी देण्यात आली आहे. इतरांबाबतीत ही हमी ७५ टक्के आहे. शिवाय वार्षिक हमी शुल्कात १० टक्के सवलत देण्यात आल्याचे मांझी यांनी सांगितले.