लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: शहरी भागात मागणी कमी असल्याने, भारतीय वाहन उत्पादकांकडून प्रवासी वाहनांची वितरकांना विक्री सरलेल्या जूनमध्ये १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली, असे मंगळवारी ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)’ या उद्योग संघटनेने स्पष्ट केले.
जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या वाहन बाजारपेठेत सलग तीन आर्थिक वर्षांमध्ये मोटारींच्या विक्रीने विक्रमी उच्चांक गाठला. परंतु २०२४-२५ मध्ये ग्राहकांच्या उत्पन्नात घट आणि पर्यायाने मागणी घटल्याचा विक्रीवर परिणाम दिसत आहे, असे ‘सियाम’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या आधी म्हणजेच वर्ष २०२४ मध्ये ८.७ टक्के, २०२३ मध्ये २७ टक्के अशा दमदार वाढीनंतर, जानेवारी ते मार्च २०२५ पर्यंतच्या विक्रीतील वाढ फक्त २ टक्के आहे.
शहरी ग्राहकांनी वर्षाच्या बऱ्याच काळासाठी खर्चात हात आखडता घेतला आहे, वेतनवाढीचे प्रमाण मागील वर्षांच्या वाढीपेक्षा कमी आहे. वाहन उत्पादकांनी गेल्या महिन्यात वितरकांना ३,१२,८४९ वाहने वितरित केली, जी गेल्या वर्षातील याच महिन्यांतील ३,३७,७५७ वाहनांच्या तुलनेत ७.४ टक्क्यांनी कमी आहेत, अशी माहिती ‘सियाम’चे महासंचालक राजेश मेनन यांनी पत्रकारांना दिली.
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत, एकूण वाहन विक्री १.४ टक्क्यांनी घसरून दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर, विक्री १३ टक्क्यांनी कमी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ९.६ टक्क्यांनी घटली होती. ताजी घसरण देखील या विशिष्ट कालावधी आणि हंगामाचा परिणाम आहे. जून तिमाहीत वितरकांना होणाऱ्या वाहनांच्या विक्रीत सामान्यपणे घट होतच असते, असे ‘सियाम’चे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले.
चीनने दुर्मिळ खनिज चुंबकाच्या निर्यातीवर आणलेले निर्बंध पाहता, वाहन उद्योगाला येत्या काळात पुरवठा-बाजूच्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. सध्या पुरते (जुलै मध्यापर्यंत) पुरेसा मालसाठा (इन्व्हेंटरी) वितरकांकडे आहे, मात्र महत्त्वाचा घटक असलेल्या चुंबकाच्या पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर उत्पादनांत अडथळ्याचा प्रसंग उद्योगांसमोर उभा राहिल, असे चंद्रा म्हणाले.
वार्षिक विक्रीत वाढ १-२ टक्क्यांचीच
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशातील एकूण वाहन विक्रीत जेमतेम १-२ टक्केच वाढ होण्याची अपेक्षा उद्योग क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. मागणी लक्षणीय कमी झाली असून, विशेषत: १० लाखांपेक्षा कमी किमतीच्या प्रवासी मोटारींबाबत ग्राहकांमध्ये खरेदीच्या भावना मंदावलेल्या आहेत. १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या मुख्यत: बहुपयोगी वाहनांच्या मागणीत मात्र वाढ उत्साहदायी राहिल, असा विश्वास सियाम’चे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी व्यक्त केला. दुचाकींमध्ये सणासुदीच्या काळात मागणीत वाढ दिसेल. केंद्राने जाहीर केलेल्या प्राप्तिकर सवलती आणि कर्जाचे घटलेले व्याजदर यासाठी उपकारक ठरतील, असे ते म्हणाले.