Petrol-Diesel Price Update: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या तीन सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दोन रुपयांनी कमी केल्या आहेत. याआधी जवळपास दोन वर्षांपासून वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. या कपातीमुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, परंतु व्हॅटच्या उच्च दरांमुळे अनेक राज्यांमध्ये वाहनांचे इंधन अजूनही १०० रुपयांपेक्षा जास्त आहे.

‘या’ राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग

देशातील आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सर्वात कमी असलेल्या राज्यांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, दिल्ली आणि पूर्वोत्तर राज्यांचा समावेश आहे. तेल कंपन्यांच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित करा (व्हॅट) च्या दरांमध्ये फरक असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये फरक आहे.

(हे ही वाचा : विमान कंपन्यांना लवकरच अच्छे दिन! प्रवासी संख्या करोनापूर्व १५ कोटींपुढे जाण्यासह, तोटाही घटण्याची शक्यता)

आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोल १०९.८७ रुपये प्रति लिटर इतके महाग आहे. यानंतर केरळमध्ये एक लिटर पेट्रोल १०७.५४ रुपयांना विकले जात आहे. काँग्रेसशासीत तेलंगणात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०७.३९ रुपये आहे. डिझेलच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये हे इंधन ९७.६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. यानंतर केरळची राजधानी तिरुवनंतपूरममध्ये ९६.४१ रुपये, हैदराबादमध्ये ९५.६३ रुपये आणि रायपूरमध्ये ९३.३१ रुपये प्रति लिटर आहे.

भोपाळमध्ये पेट्रोलचे दर १०६.४५ रुपये प्रति लिटर, पाटणामध्ये १०५.१६ रुपये, जयपूरमध्ये १०४.८६ रुपये आणि मुंबईत १०४.१९ रुपये प्रति लिटर आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपये प्रति लिटर आहे. आकडेवारीनुसार, पेट्रोलचे दर १०० रुपयांपेक्षा जास्त असलेल्या इतर राज्यांमध्ये ओडिशा (भुवनेश्वरमध्ये १०१.०४ रुपये प्रति लिटर), तामिळनाडू (चेन्नईमध्ये १००.७३ रुपये) आणि छत्तीसगड (रायपूरमध्ये १००.३७ रुपये) यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहारमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ९२ ते ९३ रुपये आहे. ओडिशा आणि झारखंडमध्येही डिझेलची किंमत सारखीच आहे.

‘या’ राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात स्वस्त

अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त आहे, जिथे ते ८२ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्यापाठोपाठ सिल्वासा आणि दमणचा क्रमांक लागतो, जेथे ते ९२.३८-९२.४९ रुपये प्रति लिटर आहे. इतर छोट्या राज्यांमध्येही पेट्रोल स्वस्त आहे. यामध्ये दिल्ली (रु. ९४.७६ प्रति लीटर), पणजी (रु. ९५.१९), ऐझॉल (रु. ९३.६८) आणि गुवाहाटी (रु. ९६.१२) यांचा समावेश आहे. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये डिझेल सर्वात स्वस्त आहे, जेथे ते सुमारे ७८ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. महानगरांमध्ये दिल्लीत सर्वात कमी व्हॅट आहे. दिल्लीत डिझेलची किंमत ८७.६६ रुपये प्रति लिटर आहे, तर गोव्यात त्याची किंमत ८७.७६ रुपये प्रति लिटर आहे.